‘मन की बात’मध्ये मोदींकडून प्रशंसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी चिंचवड वाल्हेकरवाडीतील चंद्रकांत कुलकर्णी या निवृत्त शिक्षकाने दोन लाख ६० हजारांचा निधी देऊ केला आहे. रविवारी (२६ जून) मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये याचा संदर्भ देत, अशा व्यक्ती खऱ्या अर्थाने भारताचे नायक आहेत, अशी प्रशंसा केली. तर, मोदी प्रामाणिक व चांगले पंतप्रधान वाटल्याने हा निधी दिल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
कुलकर्णी मूळचे नारायणगावचे. त्यांनी प्राथमिक शिक्षण नारायणगावात व त्यापुढील शिक्षण पुणे परिसरात घेतले. बजाज ऑटोमध्ये दीड वर्ष काम केल्यानंतर अभिनव कला महाविद्यालयात एक वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे खडकीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ते रुजू झाले. २००७ मध्ये ते निवृत्त झाले. पुढे सामाजिक कार्यात रमले. मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात महिलांच्या स्वच्छतागृहांचा मुद्दा मांडला. उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचार होतात, त्यामागे स्वच्छतागृह नसणे हे मोठे कारण असल्याचा संदर्भ त्यात होता. ते ऐकून व्यथित झाल्याने महिलांच्या स्वच्छतागृहासाठी दोन लाख ६० हजार रुपये देण्याचे कुलकर्णी यांनी ठरवले. त्यानुसार त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी राखून ठेवलेला निधी कसा घ्यायचा, असा प्रश्न पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांना पडला. त्यांनी सुरुवातीला पैसे घेण्यास असमर्थता व्यक्त केली, मात्र कुलकर्णी यांनी पाठपुरावा कायम ठेवला व मोदींना पुन्हा पत्र दिले. त्यानंतर मात्र ‘स्वच्छ भारत अभियान’ या शीर्षकाखाली त्यांचा धनादेश स्वीकारण्यात आला. मोदींनी त्यांना पत्राद्वारे उत्तर देऊन तुमची ही कृती प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. शनिवारी मोदी पुण्यात आले, तेव्हा कुलकर्णी यांनी कुटुंबासमवेत मोदींची भेट घेतली. रविवारी ‘मन की बात’मध्ये मोदींनी कुलकर्णी यांचा संदर्भ दिला. कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्ती देशाचे खरे नायक आहेत, अशी प्रशंसा त्यांनी केली.

मी एक सामान्य नागरिक आहे. पंतप्रधानांकडून बोलावणे आले, त्याचा खूप आनंद वाटला. ‘चंद्रकांतजी आईए! अशी त्यांनी नावाने हाक मारली, तेव्हा सुखद धक्का बसला. त्यांनी माझी प्रशंसा केली, मी उपकृत झालो. मात्र, त्यांनी प्रशंसा करावी, इतका मी मोठा नाही.
– चंद्रकांत कुलकर्णी

चंद्रकांत कुलकर्णी यांनी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबासमवेत भेट घेतली, तेव्हा त्यांचा पाचवीत असलेला नातू आदि सोबत होता. मोदींनी सर्वाशी संवाद साधला, तेव्हा ‘तू आजोबांच्या कामात मदत करतो का’, असा प्रश्न त्यांनी आदिला विचारला. तो निरागसपणे नाही, असे म्हणाला. मोदींनी त्याचा अलगद कान पकडला आणि ‘पुढच्या वेळी येईन, तेव्हा तू त्यांना मदत करतो आहेस, असे ऐकायला मिळाले पाहिजे,’ अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर त्यानेही होकारार्थी मान डोलावली.