उद्दिष्ट पूर्तीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ

जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाला या वर्षी शासनाकडून ६३१ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास सुमारे महिन्याचा कावालधी शिल्लक राहिला असताना आतापर्यंत ५०४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे या विभागाच्या वसुलीचा यंदा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नोटाबंदी हेही त्यामागील एक कारण असल्याचे बोलले जात आहे. शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

महसूल विभागाच्या अंतर्गत जमीन बिगरशेती करणे, नजराणा भरणे, दंड, जमीन महसूल, रोजगार हमी, शिक्षण कर, वाढीव जमीन यासह गौण खनिज, करमणूक कर, वाळू लिलाव आदी कामे येत असतात.

या विभागातून राज्य शासनाला मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळतो. त्यामुळे दरवर्षी या विभागासाठी वसुलीचे उद्दिष्ट कायमच इतर विभागापेक्षा जास्त असते. पुणे महसूल विभाग हा राज्यात इतर विभागापेक्षा जास्त महसूल देणारा विभाग आहे. त्यामुळे राज्याच्या इतर जिल्ह्य़ातून महसुलाचे उद्दिष्ट कमी झाल्यास पुणे महसूल विभागाच्या उद्दिष्टाची आकडेवारी वाढविली जाते.

मागील वर्षी राज्य शासनाने ५७८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यामध्ये पुन्हा ५० कोटीची वाढ शासनाने अचानक केली. मात्र, त्यानंतही या विभागाने ६६२ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल वसूल केला होता. त्यामुळे चालू वर्षांसाठी राज्य शासनाने वाढीव उद्दिष्ट दिले.

६३१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आल्याने सुरुवातीपासून वसुलीवर लक्ष ठेवण्यात आले असले, तरी अद्याप ५०४ कोटी रुपयांची वसुली करण्यात महसूल विभागास यश आले आहे. उर्वरित वसुली करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे. त्यातच ऐनवेळी आणखी वाढीव उद्दिष्ट शासनाकडून देण्याची शक्यता आहे.

शासनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. महिनाभरात महसुलाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. महसूल विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौणखनिज, वाळू लिलाव आणि करमणूक कर यामधून आतापर्यंत सुमारे १३० कोटी आणि उर्वरित दंड आणि इतर विभागातून आतापर्यंत ५०४ कोटी रुपयांचा महसूल वसूल झाला आहे. उर्वरित उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्यावर भर राहणार आहे.