पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्याचे निकष

स्वच्छ चारित्र्य, पक्षावरील निष्ठा, उच्चशिक्षिण, निव्र्यसनी, सुस्वभावी अशा प्रकारची गुणवत्ता एखाद्या उमेदवाराकडे असली, तरी पिंपरीच्या निवडणूक राजकारणात त्याला फारसे स्थान राहिलेले नाही. निवडणूक खर्चात ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेणारे ‘लक्ष्मीपुत्र’ आणि साम, दाम, दंड, भेद अशा नीतीचा वापर करून कसेही निवडून येऊ शकणारे, हेच उमेदवारी मिळण्याचे मुख्य निकष झाले आहेत. वरकरणी कोणीही काहीही दावे केले असले तरी राजकीय पक्षांकडून गुणवत्तेला फाटा देऊन हाच छुपा ‘अजेंडा’ राबवला जात आहे.

महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आतापर्यंत केलेले सामाजिक कार्य, राबवलेले उपक्रम, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्या असा उमेदवारांचा कार्यअहवाल असतो. मात्र, बदलत्या वातावरणात अशा कार्यअहवालास फारशी किंमत राहिलेली नाही. आता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची ऐपतच प्रामुख्याने पाहिली जात आहे. निवडणुकीत किती रक्कम खर्च करू शकतो, हाच प्रश्न वेगवेगळय़ा पद्धतीने नेतेमंडळी उमेदवारांना विचारतात, हे उघड गुपित आहे. एक कोटीपासून पाच कोटी रुपये खर्चाची तयारी ‘धनिक’ उमेदवार दाखवत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. ५० लाख रुपयांच्या आत खर्च करण्याची तयारी असणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मात्र ‘आर्थिक दुर्बल’ वर्गवारीत मोडला जातो. सद्य:स्थितीत असे अनेक ‘आर्थिक दुर्बल’ उमेदवार तिकिटासाठी पक्षांच्या प्रतीक्षायादीत आहेत. एखाद्या प्रभागात उमेदवारीसाठी जास्त उमेदवार इच्छुक असल्यास अथवा त्यांच्यात अटीतटीचा सामना असल्यास स्थानिक नेत्यांपासून दिल्ली-मुंबईच्या मोठय़ा नेत्यांचे खिसे गरम करण्याचे कामही उमेदवारांना करावे लागते. पक्षनिधीच्या गोंडस नावाखाली पैसे घेण्याचे पर्यायही राजकीय पक्षांकडे उपलब्ध आहेत. पक्षातील अन्य गरीब उमेदवारास धनिक उमेदवाराकडील निधी वळवून देण्याची परंपराही बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.

राजकीय पक्षांकडून निवडून येण्याची क्षमता याच मुद्दय़ाला सर्वाधिक महत्त्व मिळू लागल्याने वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या, मात्र या निकषात न बसणाऱ्या कार्यकर्त्यांना वाली राहिला नसल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे सतरंज्या उचलणे, िभती रंगवणे, स्लिपा वाटण्याचे काम करणारे असो, की अलीकडच्या समाजमाध्यमांवर पक्षाचा प्रचार करण्यात दिवसरात्र व्यग्र राहणारे कार्यकर्ते असो, त्यांच्यात कमालीचे नैराश्य आले आहे. अशा वातावरणात आपल्याला कधीही संधी मिळू शकत नाही, अशी धारणा या वर्गातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षाशी संबंध नसलेला, सामाजिक कार्याची पाश्र्वभूमी नसलेला एखाद्या उमेदवारास केवळ पैशाच्या जोरावर तिकीट मिळत असल्यास, आपण निष्ठेने काम करण्यात काहीच अर्थ नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पिंपरीत भाजप-राष्ट्रवादीमध्ये गर्दी

सत्तेत जाऊ शकणाऱ्या पक्षाचा अचूक अंदाज जाणकार राजकीय कार्यकर्त्यांना असतो. चलती असलेल्या राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवण्याकडे त्यांचा कल असतो, त्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारीही असते. पिंपरीतील सध्याच्या वातावरणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची गर्दी आहे.