पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे डोक्यात वीट घालून रिक्षाचालकाने एकाची हत्या केल्याची घटना घडली. सांयकाळी पाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुभाष वाघमारे या व्यक्तीचा मृत्यू झाला. संशयित रिक्षाचालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष आबाराव वाघमारे (वय वर्ष ५८ रा.पवार नगर गल्ली नंबर १, थेरगाव) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. वाघमारे आणि संशयित आरोपी सुभाष पवार हे शेजारी राहत होते. या दोघांना दारूचे व्यसन होते. वाघमारे हे बांधकामाचे कंत्राट घेत. तर पवार हा रिक्षा चालवतो. सायंकाळी पाचच्या दरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादात पवारने वाघमारे यांच्या डोक्यात वीट घातली. यात त्यांचा मृत्यू झाला. पवार पसार झाला असून वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.