पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील प्लास्टिक गोळा करून त्याचा वापर रस्त्याच्या कामात करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापुढे प्लास्टिकचे रस्ते तयार होतील, असे प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत बोलताना केले.

पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशनच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष योगेश बाबर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, माजी नगरसेवक मधुकर बाबर, बाबू नायर, उद्योजक अनिल भांगडिया आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, प्लास्टिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहे. सकाळपासून आपण प्लास्टिकचा वापर करत असतो. महत्त्वाच्या अशा कृषिक्षेत्राचा चेहरा बदलून टाकण्याचे काम प्लास्टिकमुळेच झाले आहे. प्लास्टिकची निर्मिती तांत्रिक आहे. या उद्योगाला भविष्यात मोठी संधी आहे. त्यासाठी तशी दृष्टी असली पाहिजे. जुन्या काळात लाकडाचे फर्निचर होते, आता फर्निचरमध्ये प्लास्टिकचे स्थान मोठे आहे. घरे बांधताना प्लास्टिकचा वापर वाढला आहे. रस्त्याच्या कामातही प्लास्टिकचा वापर होत आहे. उपयुक्तता असली तरी प्लास्टिकमुळे डोकेदुखीही वाढली आहे, हे नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन गर्ग यांनी केले. नितीन गट्टाणी यांनी आभार मानले.