छोटय़ा आणि चिंचोळ्या रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहनचालकांची तारेवरची कसरत

शहरातील अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जेथे जोडले जातात त्यात्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. छोटय़ा आणि चिंचोळ्या आकाराच्या रस्त्यांवरून वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे सोसायटय़ांमधील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांनी स्वनियमन करणे आवश्यक आहे तसेच त्यासाठी जनजागृती करून अपघात टाळण्याचीही गरज आहे.

दुचाक्या अतिवेगाने चालविण्याचे आकर्षण सध्या दिसून येत असून त्यामुळे रस्त्यांवरून चालणेही पादचाऱ्यांना जिकिरीचे बनले आहे. अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अडथळ्याचे बनले आहेत. मुख्य रस्त्यांवरून सार्वजनिक वाहने, तसेच जड वाहने धावतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावरून वेगात येणारी वाहने अचानक मुख्य रस्त्यावर आली तर जड वाहनांना ब्रेक लावायलाही उसंत मिळत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढ आहे. पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर झालेल्या अपघातांमध्ये १५५ नागरिकांचा बळी गेल्याची आकडेवारी पोलिसांकडे आहेत. निष्काळजीपणे आणि वाहतूक नियम धुडकावत वाहने चालवली जात असल्याचे चित्र शहरात सर्वत्र पाहायला मिळते.

मुख्य रस्त्यावरून अंतर्गत रस्त्याला मिळणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशापाशी जाहिरातींचे फ्लेक्स, पानाच्या टपऱ्या आणि चहाच्या हातगाडय़ा लावल्या जातात. त्यामुळे रस्ता ओळखणेही कठीण होऊन जात आहे. रात्रीच्या वेळी तर वाहन चालवणे अधिकच अवघड होते. त्यामुळे चकाकणारे स्टिकर्स लावणे गरजेचे आहे. अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पुढे मुख्य रस्ता आहे याबाबत सावध करण्याची गरज आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक, सूचना फलक लावण्याचीही गरज आहे.

लोकसत्ताच्या पाहणीत काय दिसले?

  • अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक, सूचनाफलकच नाहीत
  • सोसायटय़ांच्या पाटय़ांशिवाय अंतर्गत रस्त्याची ओळख होण्यासाठी ठळक फलक नाहीत
  • वेगावर नियत्रंण आणण्यासाठी गतिरोधक अपुरे
  • अंतर्गत रस्त्यावरून मुख्य मार्गावर प्रवेश करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन
  • रात्रीच्या वेळी रस्ता लक्षात येण्यासाठी चकाकणाऱ्या चिन्हांचा अभाव
  • अंतर्गत रस्त्याच्या प्रवेशाजवळच बहुतांश ठिकाणी अतिक्रमणे
  • पिंपरी डेअरी फार्म ते पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्यावर वाहतूक नियमांचा बोजवारा
  • अंतर्गत रस्त्यावरून सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाक्यांमुळे पादचाऱ्यांना अडथळे
  • चिखली मोरे वस्ती, पिंपळे सौदागर ते दापोडी, काळेवाडी भागात अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावरील प्रवेश सर्वाधिक जिकिरीचा