नवी पेठेतील लक्ष्मी पार्क परिसरातील घटना
नवी पेठेतील लक्ष्मी पार्क कॉलनीत एका बंगल्यात शिरलेल्या चोरटय़ांनी तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवून रोकड आणि दागिने असा एक लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची खळबळजनक घटना शनिवारी ( २८ मे) दुपारी घडली.
सुमंत चंद्रचुड (वय ३३, रा. लक्ष्मी पार्क कॉलनी, नवी पेठ ) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी पार्क कॉलनीत चंद्रचुड यांचा श्रीनिवास बंगला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड.हरी लक्ष्मण चंद्रचुड यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे शनिवारी दुपारी सुमंत यांनी पाहिले. खोलीचा कडी कोयंडा उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने सुमंत हे खोलीत गेले. तेव्हा खोलीत शिरलेल्या तीन चोरटय़ांनी सुमंत यांना पकडले आणि पिस्तुलाचा धाक दाखविला.
चोरटय़ांनी त्यांना जमिनीवर ढकलले. कपाटातील ६४ हजार सहाशे रुपये आणि सोन्याचे दागिने असा एक लाख ६९ हजार सहाशे रुपयांचा ऐवज लुटला. त्यांना प्रसाधनगृहात कोंडून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या सुमंत यांनी त्वरित त्यांच्या मित्रांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे मित्र घटनास्थळी आले आणि सुमंत यांची सुटका केली. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात येत आहे. लक्ष्मी पार्क कॉलनीतील रहिवासी या घटनेमुळे घाबरले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस. पवार तपास करत आहेत.