सातारा रस्त्यावरील एका सोसायटीत असलेल्या नगरसेविकेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी (२८ मे) सायंकाळी उघडकीस आली.
पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल निमंत्रण परिसरात असलेल्या मयूर सोसायटीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मनीषा चोरबेले यांची सदनिका आहे. सहा महिन्यांपूर्वी चोरबेले कुटुंबीय मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम येथे राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांची मयूर सोसायटीतील सदनिका बंद आहे. चोरबेले कुटुंबीय हे परदेशात गेले आहे. मयूर सोसायटीतील चोरबेले यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याचे शनिवारी (२८ मे) सायंकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी चोरबेले यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी मयूर सोसायटीतील चोरबेले यांच्या सदनिकेची पाहणी केली. चोरटय़ांनी दोन कपाटे फोडल्याचे निदर्शनास आले आहे. चोरबेले कुटुंबीय परदेशात गेल्याने नेमका किती ऐवज चोरटय़ांनी लंपास केला याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.