पुण्यातील अखिल मंडई मंडळाच्या प्रसिध्द शारदा गजानन गणपती मंदिरात बुधवारी पहाटे झालेल्या चोरीत ३६ लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गणपतीच्या मूर्तीवरील तब्बल ५० तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी झाल्याने सध्या या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा गणपती मंदिरातून आज पहाटे पाचच्या सुमारास मंदिराची काच फोडून गंठण, दोन चेन आणि हिऱ्याचा नेकलेस असे एकूण ३६ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. चोरट्याची प्रतिमा सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिस तपास करत आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.