सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याची मागणी, दिवाणी दाव्यासंदर्भातील फाइल चोरीला

दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातील चोऱ्या वाढल्या असून न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवाजीनगर येथील न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी रोज पक्षकार मोठय़ा संख्येने येतात, तसेच येथे आरोपींनाही सुनावणीसाठी आणले जाते. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयाच्या आवारात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे न्यायालयातून दिवाणी दाव्यासंदर्भातील कागदपत्रांची फाईल चोरीला जाण्याची घटना नुकतीच उघडकीस आली. गेल्या काही दिवसांत शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील चोऱ्या वाढल्या असून हे प्रकार थांबत नसल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी एका वकिलांनी न्यायालयाच्या आवारात मोटार लावली होती. त्यांच्या मोटारीच्या डिकीत ठेवलेली पाच लाखांची रोकड चोरटय़ांनी लंपास केली होती. वकिलांच्या विश्रामकक्षातही (बार रूम) चोऱ्या होत आहेत. बार रूममधील कप्पे उचकटून कागदपत्रांच्या फाइल तसेच बॅगा चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. एवढेच नव्हे, तर बाररूममधील पडदे, उशी अशा वस्तूदेखील चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यंतरी एका महिला वकिलाची पर्स चोरीला गेली होती. न्यायालयाच्या आवारात वाढत्या चोऱ्यांमुळे वकील त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षी न्यायालयातील एका कक्षाला आग लागली होती. आगीत न्यायालयीन कागदपत्रांच्या फाईल जळाल्या होत्या. त्याचा फटका पक्षकारांना बसला होता.

यासंदर्भात पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वाय. जी. शिंदे यांनी न्यायालयातील सुरक्षाव्यवस्था सक्षम करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, न्यायालयाच्या प्रवेशद्वारानजीक पोलिसांची चौकी आहे. न्यायालयाच्या अंतर्गत भागात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात थोडी अडचण आहे. मात्र, न्यायालयातील प्रवेशद्वारांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारातून पक्षकार, आरोपी तसेच वकील येतात. त्यामुळे न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवहीत लिहून घेणे गरजेचे आहे. बाररुममध्ये चोरी होते, तेथे लक्ष ठेवायचे कोणी हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. अंतर्गत भागात सुरक्षारक्षक ठेवल्यास होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालणे शक्य होईल.

न्यायालयाच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारानजीक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. तेथे नियुक्त करण्यात आलेले मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. न्यायालयातील पोलीस चौकीसाठी १३८ पोलिसांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात तेथे ५५ पोलीस बंदोबस्तासाठी हजर असतात.

– अ‍ॅड. वाय. जी. शिंदे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन