‘मॅगी’ नूडल्समध्ये शिशाचे प्रमाण अधिक असल्याबद्दल, तसेच त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट देखील आढळल्याबद्दल राज्य शासनाने मॅगीच्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर आतापर्यंत पुणे विभागातून तब्बल ३ कोटी १३ लाखांची मॅगी माघारी घेण्यात आली आहे. यात केवळ पुणे शहरातून परत घेतलेल्या मॅगीची किंमत दीड कोटींच्या वर आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी ही माहिती दिली. पुणे विभागात पुण्यासह, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर यांचाही समावेश होतो. यात पुण्यातून १ कोटी ६९ लाख ३८ हजारांची मॅगी वितरकांनी कंपनीकडे माघारी पाठवण्यासाठी परत घेतली. पुण्याखालोखाल साताऱ्यात ६० लाख ६९ हजार आणि कोल्हापूरमध्ये ४४ लाख ६० हजार रुपयांची मॅगी माघारी घेण्यात आली. सांगलीतून परत घेतलेल्या मॅगीची किंमत २६ लाख ७ हजार होती, तर सोलापूरमधून १३ लाख ६ हजारांची मॅगी परत घेण्यात आली. आतापर्यंत मॅगीचा जवळपास ९९ टक्के साठा परत घेण्यात आला आहे, असेही संगत यांनी सांगितले.