वाहन चालविण्याचा परवाना मिळविताना नागरिकांचा वेळ वाचावा व ही प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी, यासाठी ऑनलाइन अर्जाची योजना सुरू करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात परवाना मिळविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या चाचणी प्रक्रियेत मात्र नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करावी लागत असल्याने योजनाचा उद्देश फोल ठरतो आहे. वाहन परवाना मागणाऱ्यांच्या तुलनेत नव्या चाचणी मार्गाची क्षमता कमी असल्याने ही स्थिती निर्माण झाली असून, त्यातून सध्या नागरिकांची फरफट सुरू आहे.
वाहन चालविण्याचा शिकाऊ व पक्का परवाना मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज सादर करतानाच शिकाऊ परवान्याची परीक्षा व पक्क्य़ा परवान्यासाठीच्या चाचणीसाठी वेळ घ्यावी लागते. मिळालेल्या वेळेत संबंधित ठिकाणी जाऊन परीक्षा किंवा चाचणी द्यावी लागते. वरवर पाहता ही पद्धत अत्यंत सुटसुटीत वाटत असली, तरी या योजनेचे घोळ हळूहळू समोर आले आहेत. पुणे व िपपरी-चिंचवड शहरामध्ये दररोजच नव्या वाहनांची भर पडते आहे. त्याबरोबरच वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे परवान्याची परीक्षा व चाचणीसाठी अर्ज केल्यानंतर तीन ते चार महिन्यांच्या पुढील तारीख मिळते. त्यामुळे प्रत्यक्ष चाचणीसाठीही दीर्घ प्रतीक्षा करावी लागते.
मोटार चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या अत्याधुनिक चाचणी मार्गावर वाहन चालविण्याची चाचणी घेण्यात येते. संगणकीकृत असलेल्या या चाचणी मार्गावर खऱ्या अर्थाने चालकाची परीक्षा होते. त्यामुळे हा चाचणी मार्ग योग्य आहे. मात्र, त्याची क्षमता कमी असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये साधारणत: दीडशे नागरिकांची चाचणी घेण्याची क्षमता चाचणी मार्गाची आहे. मात्र, सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय व िपपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एका दिवशी २३० नागरिकांना या चाचणी मार्गावर चाचणी देण्यासाठी पाठविले जाते.
मोठय़ा प्रमाणात नागरिक चाचणी देण्यासाठी येत असतानाच परिवहन कार्यालयाच्या निरीक्षकांची संख्याही कमी आहे. सकाळी चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना कधीकधी संध्याकाळर्पयच वाट पाहावी लागते. काहींना दिवसभर वाट पाहिल्यानंतरही चाचणी देण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागते. नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा, असा शासनाचा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडत असल्याचे दिसते आहे.

‘‘क्षमता नसतानाही मोठय़ा प्रमाणावर नागरिकांना चाचणीसाठी पाठविले जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या चाचणी मार्गावर केवळ व्यावसायिक वाहन चालविणाऱ्यांचीच चाचणी घ्यावी. खासगी वाहन चालकांची चाचणी पूर्वीप्रमाणे आळंदी रस्त्यावरील चाचणी मार्गावर घेतली जावी. त्यातून ही समस्या दूर होऊ शकेल.’’
– राजू घाटोळे
अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन