अनेक पंपांवर कार्ड स्वीकारत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप

कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीने शासन पुढाकार घेत असताना शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरून रुपे डेबिट कार्ड हद्दपार करण्यात आले आहे. या कार्डाबाबत तांत्रिक अडचणी असल्याने पेट्रोल खरेदीसाठी ते स्वीकारणे बंद केले असल्याचे पेट्रोल पंप चालक सांगत असले, तरी अनेक नागरिकांकडे याच प्रकारचे कार्ड असल्याने त्यांची मात्र पंचायत होत आहे. संबंधित बँकाही या दृष्टीने सहकार्याची भूमिका घेत नसल्याचे दिसते आहे.

नोटाबंदीच्या काळानंतर शासनाकडून कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात येत आहे. नोटाबंदीनंतरच्या काही काळापर्यंत पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी पन्नास टक्क्य़ांहून अधिक ग्राहकांकडून कार्ड पेमेंट केले जात होते. एटीएमच्या माध्यमातून पुरेशी रक्कम उपलब्ध झाल्यानंतर मात्र पंपावरील कार्ड पेमेंटचे व्यवहार काही प्रमाणात खाली आले. मागील काही दिवसांपासून एटीएममधून पैसे मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपासह अनेक ठिकाणी नागरिकांकडून कार्ड पेमेंट केले जाते.

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेल्यास तेथे केवळ व्हिसा किंवा मास्टर कार्ड स्वरूपातील जेबिल किंवा क्रेडिट कार्डच स्वीकारले जातात. अनेक पेट्रोल पंपावर त्याबाबतचे फलकही लावण्यात आले आहेत. अनेक बँकांमध्ये नव्याने खाते काढल्यास किंवा डेबिट कार्डची मागणी केल्यास ग्राहकाला रुपे कार्ड दिले जाते. हे कार्डचे इतर कार्डाप्रमाणे सर्व व्यवहारांसाठी चालते, असे सांगण्यात येत असले तरी बहुतांश ठिकाणी हे कार्ड स्वीकारले जात नसल्याचा अनुभव ग्राहकांना येतो आहे. पेट्रोल पंप हे त्यातील एक प्रमुख ठिकाण आहे. कार्डद्वारे पेट्रोल भरण्यापूर्वीच कार्डाबाबत विचारणा केली जाते. रुपे कार्ड असल्यास पेट्रोल नाकारले जाते. त्या प्रकारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रुपेऐवजी व्हिसा किंवा इतर प्रकारातील कार्ड देण्याबाबत बँकाकडे विचारणा केली असता, त्यासाठी खात्यामध्ये जादा रक्कम भरण्याच्या सूचना केल्या जातात. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

रुपे कार्ड अद्याप नवे असल्याने अनेक स्पाइप मशीनमध्ये ते स्वीकारले जात नाही. पेमेंटसाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे इतर ग्राहकांचाही खोळंबा होतो. या कार्डबाबत अनेक तांत्रिक अडचणी येतात. संबंधित बँकांशी व्यवहाराबाबतही समस्या निर्माण होत असल्याने ते स्वीकारले जात नाही.

पेट्रोल पंप चालक ऑनलाइन पेमेंटसाठीही रुपेनाकारले

बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय पातळीची ‘नीट’ आणि राज्य पातळीवरील ‘सीईटी’ या दोन प्रवेश परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहेत. या परीक्षांसाठी मागील महिन्यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आले. परीक्षा शुल्कही ऑनलाइनच भरावे लागले. हे शुल्क भरतानाही दोन्ही परीक्षांसाठी रुपे कार्ड नाकारण्यात आले. दुसऱ्या इतर कोणत्याही कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यात येत होते. त्यामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली.