सतत अभ्यासामध्ये गुंतून राहणं आणि नवीन काही शिकणं यासाठी प्रवास करणाऱ्या रशियन विदुषीला ‘मोडी’ ची भुरळ पडली आहे. इरीना ग्लुश्कोवा या मोडीची गोडी अनुभवण्यासाठी थेट पुण्यामध्ये दाखल झाल्या आहेत.
पेशवाईच्या काळात राजव्यवहाराची असलेली मोडी लिपी मोडीत निघू नये, या उद्देशातून भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे मोडी अभ्यास वर्गाचे आयोजन केले जाते. १५ दिवसांच्या या अभ्यास वर्गाची मंगळवारी सुरूवात झाली असून यामध्ये इरीना ग्लुश्कोवा सहभागी झाल्या आहेत. रशियामधील मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी हिंदूी, मराठी, पंजाबी, भारताचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती या विषयांचे अध्यापन केले. विद्यार्थी बदलत असले तरी तेचतेच शिकविण्याचा कंटाळा आला. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी अध्यापनाचे काम बंद केले, असेही त्यांनी सांगितले.
 माणसानं सतत नवीन काही शिकत राहिलं पाहिजे. माहितीबाहेरची माहिती मिळविणे हा माझा छंद आहे. मोडी ही माझ्या माहितीबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे मोडी लिपी शिकण्याच्या उद्देशातून मी अभ्यास वर्गामध्ये आले आहे. मंदार लवाटे या उत्साही शिक्षकाने देवनागरी अक्षर आणि ते मोडीमध्ये कसे लिहिले जाते याविषयीची छान माहिती दिली.. इरीना ग्लुश्कोवा यांनी अस्खलित मराठीमध्ये संवाद साधला. १९७३ पासून महाराष्ट्रात येत असलेल्या इरीना यांनी पंढरीची वारी केली आहे. मृत्यू या विषयावर संशोधनपर लेखन केलेल्या इरीना यांचे रशियन भाषेमध्ये ‘व्यक्तिचित्रे आणि मूर्ती’ या विषयावरचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
सध्या मी ‘मराठे सरदार’ या विषयीचा अभ्यास करीत आहे. त्यासाठी दरवर्षी भारतामध्ये आल्यानंतर पुण्यात येण्याआधी ग्वाल्हेर, इंदूर, देवास या संस्थानांना भेट देत असते. या ठिकाणी पत्रव्यवहार आणि कागदपत्रे मोडीमध्ये आहेत. त्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या उद्देशातून मोडी शिकण्याची गोडी निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पीएच.डी. ही पहिली पायरीi
भारत आणि रशिया येथील मूलभूत फरक इरीना ग्लुश्कोवा यांनी नेमकेपणाने सांगितला. भारतामध्ये पीएच. डी. संपादन केल्यावर अनेक जण शिकण्याचे थांबवितात. रशियामध्ये पीएच. डी. ही पहिली पायरी आहे. ही पदवी घेतल्यानंतर खरे शिक्षण सुरू होते. भारतामध्ये डी. लिट ही पदवी सन्मानाने बहाल केली जाते. रशियामध्ये पीएच. डी. झाल्यानंतर डी. लिट. संपादन करण्यासाठी स्वतंत्र प्रबंध सादर करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.