आगामी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये असलेल्या पाचही उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार मंगळवारी बहाल करण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीतील मतदारांच्या संख्येमध्ये पाचने भर पडून ती १ हजार ७५ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, प्रकाशक-लेखक अरुण जाखडे, प्रसिद्ध लेखक शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर यांच्यामध्ये लढत होत आहे. या निवडणुकीसाठी साहित्य महामंडळाने घोषित केलेल्या १ हजार ७० मतदारांना सोमवारी (१४ सप्टेंबर) मतपत्रिका पोस्टाने रवाना करण्यात आल्या आहेत. या पाचही उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक अधिकारी प्रमोद आडकर यांनी मंगळवारी मतपेटी सीलबंद केली. या मतपेटीवर सर्व उमेदवारांची स्वाक्षरी घेण्यात आली.
साहित्य महामंडळाने जाहीर केलेल्या मतदारयादीमध्ये साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवीत असलेल्या पाचही उमेदवारांचे नाव समाविष्ट नाही. त्यामुळे महामंडळाच्या घटनेतील तरतुदीचा आधार घेत प्रमोद आडकर यांनी या उमेदवारांना मतदानाचा अधिकार देत असल्याचे जाहीर केले. ‘या अधिकारामुळे प्रत्येक उमेदवाराला किमान एक मत तरी पडेल’, अशी कोटी एका उमेदवाराने केली.