सई परांजपे हे नाव उच्चारताच ‘कथा’, ‘चष्मेबद्दूर’, ‘स्पर्श’, अशा निखळ चित्रपटांची नावे डोळ्यासमोर येतात. चित्रपट आणि दूरचित्रवाणी या दोन्ही माध्यमांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या सई परांजपे यांनी बालचित्रपटांच्या क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. आपल्या प्रदीर्घ कलाजीवनाचा प्रवास त्यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतील ‘सय’ या सदराद्वारे उलगडला होता. या सदरावरच आधारित ‘सय-माझा कलाप्रवास’ या सई परांजपे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२५ सप्टेंबर) प्रसिद्ध उद्योजक प्रकाश रत्नपारखी यांच्या हस्ते होणार आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी आणि हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर उपस्थित राहणार आहेत.

महती अवयवदानाची

juna furniture team exclusive interview at loksatta digital adda
Video : महेश मांजरेकरांना १० वर्षांपूर्वीच सुचलेलं ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं कथानक, सांगितला भावुक किस्सा
all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

अवयव रोपणाच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून रुग्णांना नवजीवन देणाऱ्या डॉ. वृषाली पाटील या शनिवारी (२४ सप्टेंबर) सखी मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ‘अवयवदान आणि देहदान’ या विषयांची माहिती देणार आहेत. निवारा सभागृह येथे सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. अश्विनी धोंगडे त्यांची मुलाखत घेणार असून डॉ. वृषाली पाटील श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही देणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ या वेळी उपस्थित राहणार आहेत.

काव्यमैफल

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘एक कवयित्री एक कवी’ या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रसिद्ध कवयित्री डॉ. संगीता बर्वे आणि प्रसिद्ध कवी संदीप खरे यांच्याशी गप्पा आणि काव्याची मैफल रंगणार आहे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये सोमवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रदेव टिळक

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेची शताब्दी, ‘गीतारहस्या’ची शताब्दीपूर्ती आणि लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचे शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्ष असा त्रिवेणी योग साधून चतुरंग प्रतिष्ठानने रविवारी (२५ सप्टेंबर) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कर्वेनगर येथील शैलेश सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता ‘राष्ट्रदेव लोकमान्य’ या विषयावर चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान होणार आहे.

‘मृगनयनी मनस्विनी’ पुस्तकाचे प्रकाशन

आशय फिल्म क्लब आणि पद्मगंधा प्रकाशनतर्फे विनिता महाजनी यांनी लिहिलेल्या ‘मृगनयनी मनस्विनी : ऑड्री हेपबर्न’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (२५ सप्टेंबर) प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उद्योगपती अरुण फिरोदिया उपस्थित राहणार आहेत. प्रकाशन कार्यक्रमानंतर ऑड्री हेपबर्न हिच्यावरील लघुपट आणि तिचा गाजलेला ‘रोमन हॉलिडे’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर, सोमवारी (२६ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता ‘माय फेअर लेडी’ आणि दुपारी दीड वाजता ‘वेट अनटिल डार्क’ हे दोन चित्रपट पाहण्याची संधी लाभणार आहे.

उमा-पर्व

कानडी भाषेतील ज्येष्ठ कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांच्या प्रमुख कादंबऱ्यांसह ५१ कानडी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करून अनुवादविश्व समृद्ध करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका डॉ. उमा कुलकर्णी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी ‘आल्हादिनी पुणे’ संस्थेने शनिवारी (२४ सप्टेंबर) उपलब्ध करून दिली आहे. पौड रस्त्यावरील गुरुराज सोसायटीच्या गणेश सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात गीतांजली जोशी आणि दीपाली दातार या उमा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

व्याख्यान चित्रकाराचे

कला शिक्षणाच्या प्रचारासाठी झटलेले ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्याशी संवाद साधण्याची संधी शनिवारी (२४ सप्टेंबर) कलाप्रेमींना मिळणार आहे. पुणे बिनाले फाउंडेशनतर्फे कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘चित्रकला शिक्षण आणि आपण’ या विषयावर कोलते यांचे व्याख्यान होणार आहे.

‘ट्री ऑफ लाइफ’

नैसर्गिक रंगांचा वापर करून कॉटन आणि सिल्कवर कलाकारी केलेल्या चित्रांचे ‘ट्री ऑफ लाइफ’ हे आगळेवेगळे चित्रप्रदर्शन भोसलेनगर येथील इंडिया आर्ट गॅलरी येथे भरविण्यात आले आहे. गुजरातमधील विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक दिवंगत तनसुख महिचा आणि त्यांची मुलगी महिचा यांनी हळदीपासून पिवळा रंग, पानांपासून हिरवा रंग आणि जास्वंदीच्या फुलांपासून लाल रंग बनवून ही चित्रे साकारली आहेत. ३० सप्टेंबपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.