सई परांजपे यांची विविध रूपे उलगडली

लहान मुलांना आवडणारी आकाशवाणीवरील ‘सई ताई’, कुणाला फुलबाजीच्या तारकाफुलांसारखी वाटणारी मैत्रीण, चित्रपटांच्या छायाचित्रीकरणाच्या वेळी प्रसंगी कडक स्वभावाची होणारी दिग्दर्शिका..सई परांजपे यांची अशी विविध रूपे उलगडली. निमित्त होते सई परांजपे यांनी लिहिलेल्या ‘सय- माझा कलाप्रवास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे.

सई यांच्या चाहत्यांनी आयोजित केलेल्या या समारंभासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेत्री ज्योती सुभाष, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, प्रा. मिलिंद जोशी, संगीतकार राहुल रानडे, सुदर्शन आठवले, सरोजा परुळकर, कल्याण वर्दे, वंदना खांडेकर, ए. एस. कनल, प्रवीण लाखे, पद्मजा लाखे उपस्थित होते. सई यांच्या ‘स्पर्श’, ‘दिशा’, ‘गुलाबी’ अशा कलाकृतींमधील काही दृश्ये या वेळी दाखवण्यात आली, तसेच त्यांनी आपल्या पुस्तकातील काही उताऱ्यांचे अभिवाचनही केले.

सईच्या स्वभावातील प्रांजळपणा त्यांच्या लेखनात जसाच्या तसा उतरल्याने ते लेखन वाचकांना भिडते व त्यामुळेच ते अधिक वाचनीय होते, अशी भावना माजगावकर यांनी व्यक्त केली. ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘‘सई नुसतीच मनमोकळी नव्हे तर खुल्या स्वभावाची आहे. तिचा खुलेपणा, धीटपणा व प्रसन्नता यांनी मला नेहमीच मोहून टाकले. कोणतीही गोष्ट सोपी व सुगंधी करून टाकण्याची तिची पद्धत आहे.’’

आपले पहिले व्यावसायिक नाटक ‘बिकट वाट वहिवाट’ हे सई यांच्या दिग्दर्शनाखाली करायला मिळाले, असे सांगून प्रभावळकर म्हणाले, ‘‘तेव्हाही त्यांच्याभोवती वलय होते आणि त्यांनी माझी निवड करणे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. त्यांचे सहजसुंदर संवाद व लेखन असलेल्या ‘नांदा सौख्यभरे’मध्येही मी काम केले. माझ्या करिअरमध्ये मी कधी कुठली भूमिका मागितली नाही, परंतु सई यांनी पुन्हा एखादा चित्रपट बनवल्यास मी नक्की काम करीन. मला त्यांची सृजनशीलता पुन्हा अनुभवायची आहे.’’ संध्या देवरुखकर यांनी सूत्रसंचालन केले.