भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा.. कर्तव्यकठोर निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा.. तुमच्या ‘उद्या’साठी आपला ‘आज’ देणारा.. डोळ्यांत तेल घालून आणि आपल्या प्राणांची बाजी लावून देशाच्या सीमांचे रक्षण करणारा.. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून ‘सैनिक’ या मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांतील पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (२६ जुलै) कारगिल येथे होणार आहे.

राजहंस प्रकाशनतर्फे अनुराधा प्रभुदेसाई यांनी लिहिलेल्या ‘सैनिक’ आणि ‘द सोल्जर’ या दोन भाषांतील पुस्तकांची प्रथमच निर्मिती करण्यात आली असून या दोन्ही पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन होणार आहे. ‘इंग्लिश लर्निग अँड टिचिंग इन्स्टिटय़ूट ऑफ सिम्बायोसिस’चे प्रमुख शिरीष सहस्रबुद्धे यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. या पुस्तकाची मांडणी आणि मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे, अशी माहिती राजहंस प्रकाशनचे संचालक-संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी दिली.

‘लक्ष्य फाउंडेशन’च्या माध्यमातून अनुराधा प्रभुदेसाई या गेल्या दीड दशकापासून सैन्यदल आणि नागरिक यांच्यामध्ये भावनिक नात्याच्या पूल उभारण्याचे काम करीत आहेत. फाउंडेशनमार्फत सीमेवरील जवानांना राखी पोहोचविण्याच्या उपक्रमामध्ये त्यांचा पुढाकार असतो. युवकांना सैन्यदलामध्ये सहभाग घेण्यासाठी त्या प्रोत्साहन देत आहेत. या कामामध्ये अनेक जवानांच्या आणि हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांशी त्यांचा ऋणानुबंध जुळला. या कामामध्ये आलेले विविध हृदयस्पर्शी अनुभव आणि सैनिक हा माणूस म्हणून त्यांना कसा भावला, त्याचे चित्रण प्रभुदेसाई यांनी ‘सैनिक’ या पुस्तकाद्वारे केले आहे, असेही बोरसे यांनी सांगितले.