पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्यावर्षी टोलवसुली करणाऱ्या कंपनीने या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची सरासरी आकडेवारीची मोजदात केली.राज्य रस्ते विकास महामंडळानेदेखील एका सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून  द्रुतगती मार्गावरून एका आठवडय़ात किती वाहने धावली ,याचे चित्रीकरण करून आकडेवारी जाहीर केली होती. टोलवसुली करणाऱ्या कंपनीने सादर केलेल्या आकडेवारीत तफावत आहे.त्यामुळे या आकडेवारीची शहानिशा पूर्ण होईपर्यंत द्रुतगती मार्गावरील टोलवसुली स्थगित करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.
सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर यांनी मंगळवारी ही आकडेवारी पत्रकारपरिषदेत सादर केली. आकडेवारीतील तफावत त्यांनी दाखवून दिली. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी )जुलै २०१५ मध्ये द्रुतगती मार्गावर धावलेल्या वाहनांचे चित्रीकरण (व्हीडीओग्राफी )केले. १८ ते २४ जुलै दरम्यान द्रुतगती मार्गावरील खालापूरसह तळेगांव, कुसगांव, शेडुंग या टोलनाक्यांवर वाहनांची मोजणी करण्यात आली. माहिती आधिकाराचा वापर करून संजय शिरोडकर यांनी ही आकडेवारी मिळवली, अशी माहिती विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर यांनी दिली.
ते म्हणाले, मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या आदेशानंतर एमएसआरडीसी ने जुलै २०१५ मध्ये धावलेल्या या चार टोलनाक्यावरून धावलेल्या वाहनांची आकडेवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली, जी एमएसआरडीला टोल कंत्राटदाराकडून मिळाली आहे. या दोन्ही आकडेवारीमध्ये पन्नास टक्क्य़ांची तफावत आहे. द्रुतगती मार्गावर टोलवसुली करणाऱ्या कंत्राटदाराने दिलेले आकडे जवळपास टक्क्य़ांनी कमी आहेत.
चित्रीकरणामधील वाहनांची आकडेवारी आणि कंत्राटदाराने दिलेली आकडेवारी यात एवढी तफावत कशी आहे, याची चौकशी व्हावी. तसेच, दोन्ही आकडेवारी समोर दिसत असताना मूग गिळून गप्प राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.एकंदर या आकडेवारीची शहानिशा होईपर्यंत द्रुतगती मार्गावरील टोलवसुली स्थगित करण्यात यावी, अशी मागणी वेलणकर आणि शिरोडकर यांनी केली.