कला समीक्षक शांता गोखले यांचे मत
नाटकामध्ये अभिनयाबरोबरच तांत्रिक अंगांना महत्त्व आल्यामुळे नाटककार हा सध्याच्या रंगभूमीचा केंद्रिबदू राहिलेला नाही, असे मत ज्येष्ठ कला समीक्षक आणि अनुवादिका शांता गोखले यांनी शनिवारी व्यक्त केले.
संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शांता गोखले यांचा साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे पृथ्वी थिएटर्सच्या संचालिका संजना कपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त अशोक कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
रंगभूमीच्या वाटचालीमध्ये नाटककार हाच प्रामुख्याने केंद्रिबदू राहिलेला आहे, असे सांगून शांता गोखले म्हणाल्या, मराठीमध्ये १८८० ते १९३० या संगीत नाटकाच्या कालखंडात नाटककाराचे शब्द कलाकाराकडून बोलून घेणारे ‘तालीम मास्तर’ म्हणजेच दिग्दर्शक होते. त्यानंतरचा रंगभूमीचा काळ हा अभिनेता आणि व्यवस्थापकाचा होता. पृथ्वी थिएटर्स आणि पृथ्वीराज कपूर हे त्याचे ठळक उदाहरण सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये जेवढे नाटककार जन्माला आले तेवढे देशाच्या कोणत्याही प्रांतात आढळून येणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक हे नाटकवेडे आहेत. बंगालमध्ये नाटककार यापेक्षाही नाटकाचे कथासूत्र आणि अभिनय या बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या तांत्रिक अंगांना महत्त्व आल्यामुळे नाटककार हा रंगभूमीचा केंद्रिबदू राहिलेला नाही.
आळेकर म्हणाले, सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेत मी ‘मिकी आणि मेमसाब’ नाटक वाचले होते तेव्हा प्रेक्षकांमध्ये शांता गोखले होत्या. त्यांनी माझ्या नाटकांसह विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार यांची नाटके इंग्रजीमध्ये अनुवादित केली आहेत. त्यामुळे मी नाटककार म्हणून मराठीच्या पलीकडे जाऊ शकलो.
शांता गोखले यांच्यासारखे दुसऱ्याच्या लेखनावर मन:पूर्वक प्रेम आणि गांभीर्यपूर्वक भाषांतर करणारे व्यक्तिमत्त्व लाभले म्हणूनच मराठी साहित्य आणि नाटय़कृती देशभरात पोहोचल्या. उत्तरार्धात ‘बदलत्या काळामध्ये नाटककाराचे स्थान नेमके कोठे आणि कशा प्रकारचे आहे’ या विषयावर संजना कपूर यांनी गोखले यांच्यासह सुनील शानबाग, इरावती कर्णिक आणि मोहित टाकळकर यांच्याशी संवाद साधला.