वेदपाठशाळा पद्धतीने संस्कृत व्याकरणाचे पाठ पुण्यासह जगभरातील अभ्यासक सध्या एका पाश्चात्य विद्वानाकडून घेत आहेत. संस्कृत व्याकरण या विषयावरील या बहुदेशीय कार्यशाळेचे आयोजन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अन्य संस्थांच्या मदतीने केले आहे. या कार्यशाळेचे चित्रीकरणही केले जात असून जगभरातील काही शहरांमध्ये ते थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अभ्यासकांना पाहता येत आहे. भविष्यात कार्यशाळेतील व्याख्याने ‘यू-टय़ूब’वरही पाहता येतील.
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील पेनसिल्वानिया विद्यापीठाचे मानद प्राध्यापक आणि संस्कृत भाषाशास्त्र-व्याकरण या विषयाचे विद्वान जॉर्ज कादरेना हे या कार्यशाळेचे मार्गदर्शक आहेत. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते संस्कृत व्याकरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रा. कादरेना यांची संस्कृत व्याकरण विषयावरील कार्यशाळा आयोजित केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत-प्राकृत विभाग, पाली भाषा विभाग, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र हे तीन विभाग, संविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ कल्चरल स्टडीज, पाणिनी प्रतिष्ठान, संस्कृत प्रचारिणी सभा आणि ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळ या संस्थांचे कार्यशाळेसाठी सहकार्य लाभले आहे, अशी माहिती भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी दिली.
या कार्यशाळेत पुणे, मुंबई, हैदराबाद या शहरातील विद्यार्थ्यांसह जपान आणि जर्मनी येथील संस्कृतचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक असे ८० जण सहभागी झाले आहेत. फिरोदिया वसतिगृह येथे दररोज सकाळी दहा ते बारा या वेळात ही कार्यशाळा होत असून ४ मार्चपर्यंत पाच आठवडय़ांची ही कार्यशाळा सुरू राहणार आहे. प्रा. जॉर्ज कादरेना हे वेदपाठशाळा पद्धतीने शब्दनशब्द ग्रंथ वाचून त्या शब्दांचे अर्थ आणि आवश्यक स्पष्टीकरणासह विवेचन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कारक या विषयावर पाणिनी, पतंजलीपासून ते मध्ययुगीन संस्कृत ग्रंथांचा वेध घेत त्यातील तत्त्वज्ञान आणि बौद्ध-वैद्येधिक दर्शनांचे खंडन याची उकल त्यांच्या विवेचनातून विद्यार्थ्यांना होत आहे. पुण्यासह मुंबई येथील आयआयटी, ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ आणि जर्मनी येथे या कार्यशाळेचे ‘ऑनलाईन’ स्वरूपामध्ये थेट प्रक्षेपण होत आहे. विद्या प्रसारक मंडळ त्यांच्या व्याख्यानांचे चित्रीकरण करीत असून भविष्यामध्ये ही व्याख्याने ‘यू-टय़ूब’वरही पाहता येणार असल्याचे डॉ. बहुलकर यांनी सांगितले.