भागवत धर्मातील वादन, गायन, कीर्तन, प्रवचन आदी कला अवगत करण्यासाठी, नव्या पिढीला शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. देहू-आळंदीच्या कुशीत असलेल्या टाळगाव चिखलीत हे विद्यापीठ सुरू होणार असून त्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम राहणार आहे. डॉ. सदानंद मोरे, बंडातात्या कराडकर, डॉ. रामचंद्र देखणे आदींचा यासंदर्भातील समितीत समावेश राहणार आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या पाठपुराव्यानंतर आयुक्त राजीव जाधव यांनी तयार केलेला याबाबतचा प्रस्ताव सोमवारी पालिका सभेत दाखल करण्यात आला. या विषयावर १३ मेच्या सभेत सर्व मुद्दय़ांवर चर्चा होऊन अंतिम निर्णयही अपेक्षित आहे. टाळगाव चिखलीत तुकोबांचे वास्तव्य होते. याशिवाय, परिसरात मोठय़ा प्रमाणात वारकरी राहतात. भागवत धर्मामध्ये वादन, कीर्तन, गायन, प्रवचन आदी कला अवगत करण्यासाठी नवीन पिढीला प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिकेच्या ‘संगीत अकादमी’च्या धर्तीवर वारकरी सांप्रदायातील सर्व कलागुणांचे जतन, प्रसार व शिक्षण होण्यासाठी संतपीठाची संकल्पना मांडल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.
पहिल्या वर्षांत व्याकरण मराठी पुस्तक, संस्कृत भांडारकर पुस्तक (१२ पाठ), श्रीमद्भगवतगीता संथा व विष्णूसहस्रनाम, ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पूर्ण व नवव्या अध्यायातील ५० ओव्या, वारकरी भजनांचा समावेश आहे. दुसऱ्या वर्षांत विचारसागर, गीता संपूर्ण अन्वय अर्थासह, ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय, ५१ पासून पुढे ओवी, भजनसंग्रहातील वाराचे व जन्माचे संपूर्ण अभंग समाविष्ट आहेत. तिसऱ्या वर्षांत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय, पंचदशी प्रकरणे १ ते सात, ज्ञानेश्वरीतील १५ वा अध्याय, भजनसंग्रहातील अभंग असून चौथ्या वर्षांत ज्ञानेश्वरी अध्याय १३ ते १८, पंचदशी प्रकरण ८ ते १५, ज्ञानेश्वरी पाचवा व सातवा अध्याय, गाथेतील संतपर प्रकरण आणि आठवडय़ातील तीन दिवस कीर्तन असा अभ्यासक्रम राहणार आहे. यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असून आवश्यक कर्मचारी वर्गाची नव्याने भरती करण्यात येणार आहे. संतपीठासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या सल्लागार समितीत महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षणाधिकारी यासह संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, डॉ. रामचंद्र देखणे, मारूती महाराज कुरेकर, बंडातात्या कराडकर, साखरे महाराज आदींचा समावेश राहणार आहे. अभ्यासक्रमातील फेरबदलाचे अधिकार समितीला राहणार आहेत.