‘‘सार्क संघटनेतील देशांना सध्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत असून या देशांनी विकास घडवून आणण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘सार्क नॉलेज प्लॅटफॉर्मची स्थापना व्हावी’’ असे मत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी गुरुवारी व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूशन्स इन साऊथ एशिया (ए एम डी आय एस ए) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बाराव्या साऊथ एशियन मॅनेजमेंट फोरम’ च्या उद्घाटन समारंभामध्ये डॉ. कलाम बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर, एएमडीआयएसएचे अध्यक्ष पुण्य प्रसाद नेप्युणे, एएमडीआयएसएचे माजी अध्यक्ष वाय. के. भूषण, एएमडीआयएसएचे उपाध्यक्ष डॉ. अशोक जोशी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कलाम म्हणाले, ‘‘आर्थिक असमतोल, गरिबी, बेरोजगारी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अभाव, ऊर्जा, पाणी, हवामानातील बदल, पर्यावरण, राहणीमानाचा दर्जा, आरोग्याचे प्रश्न, विविध  विषाणूंचा प्रादुर्भाव अशा अनेक आव्हानांना सार्क संघटनेतील प्रत्येक देशाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, त्याचवेळी प्रत्येक देशाचे आपापले बलस्थान आहे. या सर्व देशांनी एकत्र येऊन संपूर्ण दक्षिण आशियातील देशांच्या विकासासाठी एक मिशन म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या देशांच्या प्रतिनिधींनी आपापसातील मतभेदांबाबत चर्चा करण्यापेक्षा विकासाची चर्चा करणे आणि विकास घडवून आणण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘सार्क नॉलेज प्लॅटफॉर्मची स्थापन करण्यात यावी. त्यामध्ये प्रत्येक देशाला समान प्रतिनिधित्व आणि समान संधी देण्यात यावी. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या देशांनी ई-नेटवर्क, ई-पार्टनरशिप सुरू करावी. ऊर्जा स्रोतांचे संरक्षण, ऊर्जेचा पुनर्वापर, पाण्याचा प्रश्न, नद्यांची जोडणी, सागरी पाण्याचे शुद्धीकरण, एड्स, क्षय यांसारखे रोग आणि विविध विषाणूंवर औषधे शोधणे, शेतीतील नवीन तंत्रज्ञान अशा विविध विषयांमध्ये संशोधन करावे. या संशोधनाच्या माध्यमातून क्षमता उंचावण्यासाठी प्रत्येक देशाने परस्परांना सहकार्य करावे. हे चित्र प्रत्यक्षात आल्यास सार्क देशही युरोपियन देशांप्रमाणे शांततापूर्ण होतील.’’
 

तरुणांमधील ऊर्जा ही पृथ्वीवरील सर्वात मोठी शक्ती
इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सच्या विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांचे मार्गदर्शन
‘‘तरुणांमधील ऊर्जा ही पृथ्वीवरील सर्वात मोठी शक्ती आहे,’’ असे मत डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांनी इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये गुरुवारी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कलाम म्हणाले, ‘‘तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सतत नवे काहीतरी शिका, सतत ज्ञानाच्या शोधात राहा आणि मेहनत करा. जिंकण्याचा आत्मविश्वास बाळगा, अडचणींनाही त्याच आत्मविश्वासाने तोंड द्या, मग तुम्हाला नक्कीच यश मिळेल.’’