‘मोठी स्वप्न पाहणारी माणसं एकत्र आली की भव्यता अनुभवाला येते. मात्र, आम्हाला आमच्या पुरतच क्षितिज दिसतं. मराठी साहित्याला सध्या डोंगरापलिकडे जाऊन क्षितिजापर्यंत पोहोचण्याची स्वप्न पाहणाऱ्यांची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी केंद्रे यांच्याशी संवाद साधला.
या वेळी केंद्रे म्हणाले, ‘‘लोककलेतून मला नाटक आणि त्याची आवड गवसली. त्यामुळे माझ्या नाटकावर एखाद्याच शैलीचा प्रभाव दिसत नाही. माझ्या नाटकाची रंगभाषा ही नवी असते. नाटकातील कलात्मकता, व्यामिश्रता ग्रामीण भागातील माणूस समजू शकतो हे आम्ही मान्यच करत नाही. त्यामुळे आपल्याकडे सरधोपटपणा येऊ लागला आहे. नाटकाचा कलात्मक दर्जा राखून ते लोकांशी जोडण्याची क्षमता येत नाही, तोपर्यंत नाटक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. माणसाच्या जगण्याशी नाटक जोडले गेले पाहिजे. लोकांना भिडणे हे चांगल्या कलाकृतीचे लक्षण आहे. मराठी नाटकाला मोठी परंपरा आहे. व्यावसायिकता हे आपल्या नाटकाचे बलस्थान आहे. मात्र, ती  सर्व जगापर्यंत पोहोचत नाही. कारण त्यामागे आपला विचार कमी पडतो. आपल्याकडे शब्दप्रधान नाटके आहेत. दृश्यात्मक परंपरेकडे आपले दुर्लक्ष होते आहे.’’
अभिजात नाटकांची मोडतोड करण्याचं धाडस कुठून येतं? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रे म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट मोडली, तरी आजच्या काळाशी जोडताही आली पाहिजे. सादरीकरणाच्या पद्धतीला आजच्या काळाच्या संदर्भातून प्रश्न विचारत नाही, तो पर्यंत त्याच्या आशय-विषयाला अर्थ नाही. व्यवस्थेला, चौकटीला प्रश्न विचारता आले पाहिजेत. आपण प्रश्न विचारत नाही, तोपर्यंत आपल्याला नवे काही सापडणार नाही. ’’
भारतात २०१७ मध्ये थिएटर ऑलिम्पियाड व्हावे असे माझे स्वप्न आहे, आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही केंद्रे यांनी सांगितले.