सतीश आळेकर यांचे ‘लोकरंग’मधील सदर पुस्तकरूपात

‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ ‘एक दिवस मठाकडे’ अशा नावीन्यपूर्ण नाटकांद्वारे आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आता ‘गगनिका’ या पुस्तकाच्या माध्यमातून रसिक वाचकांच्या भेटीस येत आहेत. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतील हे सदर आता पुस्तकरूपात येत असल्याचा आनंद झाला, अशी भावना सतीश आळेकर यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचं नसलेलं, पण नाटकाविषयी असलेलं’ असंच आहे. एका अर्थाने ललितगद्य स्वरूपाचे लेखन ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये यापूर्वी सदर स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. या सदराला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजहंस प्रकाशनने आता हे सदरलेखन पुस्तकरूपात आणले आहे. त्यामुळे काही भागांचे पुनर्लेखन केले असून काही अप्रकाशित, तर काही पूर्वप्रकाशित लेखांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. माझे ज्येष्ठ सन्मित्र नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते रविवारी (३० एप्रिल) रोजी ‘गगनिका’चे प्रकाशन होणार आहे, असे आळेकर यांनी सांगितले. आशय सांस्कृतिकतर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात आळेकर या पुस्तकातील दोन प्रकरणांचे अभिनयासह वाचन करणार आहेत. उत्तरार्धात साहित्य अकादमी निर्मित मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘चिरेबंदी’ हा महेश एलकुंचवार यांच्या जीवनावरील चरित्रपट दाखविण्यात येणार आहे.

माझी पिढी स्वातंत्र्योत्तर काळातील. १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह मी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवरच्या या दोन घटनांचे सांस्कृतिक पटलावर नेमके काय पडसाद उमटले, त्याचे नाटकांवर काय परिणाम घडले याचा ऊहापोह या सदरलेखनाच्या माध्यमातून मी व्यक्तिगत पातळीवरून घेतला, अशा शब्दांत आळेकर यांनी या लेखनामागची पाश्र्वभूमी सांगितली. यापूर्वी मी नाटकाचे संवाद वगळले तर काहीच लिहिले नव्हते. त्यामुळे ललितगद्य स्वरूपातील लेखन पहिल्यांदाच केले आहे. मी अशा पद्धतीचे लेखन करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. नाटकाचा प्रेक्षक जिवंत असतो. पुस्तकाचा वाचक अदृश्य असतो. त्यामुळे चेहरे ठाऊक नसलेल्या लोकांची या लेखनाविषयीची प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे, असेही आळेकर यांनी सांगितले.