मुलांना सुट्टय़ा लागल्या, की त्यांचा वेळ आता कसा जाणार या विचाराने पालकांची चिंता वाढते. मग मुलांना कुठे ‘अडकवावे’ यासाठी उन्हाळी सुट्टय़ांच्या शिबिरांची शोधाशोध सुरू होते. या शिबिरांमधील नानाविध प्रचंड महागडय़ा उपक्रमांनी पालकांचे डोळे दिपून जातात. पण महागडे शिबिर हा एकच निकष सुट्टीतील शिबिर निवडताना पुरेसा आहे का, मुलांचे नेमके काय हरवले आहे, ते शोधण्यासाठी त्यांना या सुट्टीत कशी मदत करता येईल, याबाबत सांगताहेत ‘बालभवन’च्या संचालक शोभा भागवत.

   पूर्वीची सुट्टी आणि आताची सुट्टी यात काय फरक जाणवतो?
– आमच्या लहानपणी शिबिरे नव्हती. पण घरे मोठी असत, सुट्टीत नात्यातील २०-२५ मुले गावातल्या घरी जमायची आणि मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी मोठे लोक घरी असायचे. एकत्र खेळणे, फिरायला जाणे यातून एकमेकांना बघत खूप शिकायला मिळायचे. घरात पाटपाणी कर, बाहेरून काही वस्तू आणून दे, यातून मुले घरातील कामाचा एक भाग व्हायची. आता या गोष्टी राहिल्या नाहीत. पण आता एका घरात २५ मुले महिनाभर राहताहेत ही कल्पनाही करता येणार नाही. पण हा सामाजिक बदलच आहे. त्यासाठी आईबाबांना दोष देता येणार नाही. त्यांचीही ससेहोलपट होत असते. मुलांना वर्षभर जे करता येत नाही, ते त्यांना सुट्टीत करायला मिळायला हवे. आता मुलांना पूर्वीसारखे स्वातंत्र्य मिळत नाही. त्यांची स्वत:ची शिकण्याची क्षमता त्यामुळे आपण कमी करतो.
सुट्टीतील शिबिरांना बाजारी स्वरूप प्राप्त झाले आहे का? तुमचे निरीक्षण काय?
– अनेकदा पालक म्हणतात, की शिबिराला फी कमी आहे म्हणजे शिबिर चांगले नसणार! शिबिर घेणाऱ्यांना वर्षभर ते काम करण्याचा अनुभव आहे का, की केवळ उन्हाळ्यात शिबिरे घेतली जात आहेत हेही पाहिले जात नाही. काही शिबिरांचा कार्यक्रम पाहिल्यावर खरेच त्यात शिकवलेल्या गोष्टींचा मुलांना उपयोग आहे का, असा प्रश्न पडतो. उन्हाळी शिबिरात शेकोटी, लहान मुलांना सुट्टीत शिबिरात जेवणाचे पाश्चात्त्य ‘एटीकेट्स’ शिकवणे, याची गरज आहे का? पालकांना शिबिरे हवी आहेत हे लक्षात आल्यावर वाटेल ते कौशल्य वापरून त्याचे शिबिर सुरू करण्यास सुरुवात झाली. एखाद्या स्त्रीने आपले शिवणाचे कौशल्य गल्लीतील दहा मुलांना शिकवणे हे समजण्यासारखे आहे, पण ज्या कौशल्यांना ‘ग्लॅमर’ आहे त्याची शिबिरे निघू लागली. ‘तुम्ही परदेशात नेऊन शिबिरे घेता का?,’ अशीही विचारणा पालक करतात व त्यांची तशी आर्थिक तयारीही असते. पालकांकडे पैसा आहे आणि भरपूर पैसे जिथे घेतील ते शिबिर चांगले, अशा प्रकारे काही धरबंद राहिलेला नाही.
मग सुट्टीतील शिबिरात काय हवे?
– शिबिरांची आखणी करताना खूप विचार करून उपक्रम निवडावे लागतात. आमच्या एका शिबिरात रोज काहीतरी खाऊ बनवण्याचा कार्यक्रम असतो. पोहे किंवा जे काही केले असेल ते आवडले, तर मुले उत्साहाने त्याची कृती लिहून घेतात आणि आईला नेऊन देतात. शिबिराच्या काळात मुलांना घरी करण्यासाठी बारा कामे सांगितली जातात. तुमचे कपाट लावा, ओटा पुसा, आईला सरबत करून द्या, एक दिवस स्वत: दोन कपडे धुवा, एक दिवस संडास साफ करा अशी साधी कामे असतात. ‘ताई, हे शेवटचे काम आम्ही करणार नाही,’ असे मुले म्हणतात, पण ते केल्यावर स्वत:चे घर आपण चांगले ठेवले या भावनेने त्यांना छान वाटते. शिबिराच्या समारोपाला आम्ही आजीआजोबांना बोलावतो. मुले त्यांच्यासाठी स्वत: काहीतरी वस्तू आणि सरबत करून देतात. कुणासाठी काहीतरी करायचे असते हा संस्कार आता घरातूनही संपत चालला आहे, त्यामुळे ते शिबिरातून मिळणे महत्त्वाचे वाटते. मोठय़ा मुलांच्या निवासी शिबिरांमध्ये त्यांना शेतीतील प्रयोग दाखवले जातात. शेणापासून खताचे गोळे करणे, वेलाचे दुधीभोपळे काढून देणे, काटक्या गोळ्या करणे, चिंचेतील बिया वेगळ्या काढणे ही कामे करताना शेती करणे सोपे नाही हे लक्षात येते. आज मुलांना कशाचेच कौतुक वाटत नाही. अशा परिस्थितीत सायकल चालवून निर्माण केलेल्या ऊर्जेवर टीव्ही चालतो, पाणी विहिरीतून काढावे लागते हे पाहिल्यावर त्यांना नवल वाटते. पायी चालत पुण्यातील रस्ते, झाडे, गरीब आणि श्रीमंत वस्त्या बघणे अशा उपक्रमांमधूनही नवीन गाव बघायचे कसे हे कळते.
अगदी लहान मुलांसाठी काय?
– अगदी दीड वर्षांपासूनच्या छोटय़ा मुलांसाठी शिबिरात काय घेता येईल हा प्रश्नच असतो. पण फुगवलेले फुगे, साबणाच्या पाण्याचे फुगे अशा साध्या खेळात या मुलांना खूप गंमत वाटते. आम्ही या मुलांसाठी खाऊचे झाड तयार केले होते. खोटय़ा लाकडी झाडाला खिळे ठोकून त्यावर प्रत्येक मुलाचे नाव लिहिले व तिथे कधी गोळी, कधी चणे असा रोज नवीन खाऊ ठेवू लागलो. आज झाड आपल्याला काय देणार, याची उत्सुकता मुलांना खूप वाटे. हॉलमध्ये कागद अंथरून आणि टबांमध्ये रंग तयार करून मुलांना हातापायांच्या ठशांनी रंगवायला सांगणे, यातही गंमत असते. अशा कितीतरी गमती शोधून काढता येतील.

dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
100 Ghungaru Nagin Chappal Price Will Shock You Watch Video
७ नागाचे फणे, सहा किलो वजन, पंढरपूरच्या दानवेंची ‘नागीण चप्पल’ दिसते कशी? किंमत ऐकून थक्कच व्हाल
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”