ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, जाणीव आणि वंचित विकास या संस्थांचे संस्थापक आणि या संस्थांच्या माध्यमातून उपेक्षितांसाठी गेली पाच दशके समाजसेवेत अखंड मग्न असलेले नाव म्हणजे विलास चाफेकर. चाफेकर यांचा अमृतमहोत्सव शनिवारी पुण्यात साजरा होत आहे. सामाजिक कार्याचा उदंड अनुभव असलेल्या चाफेकर यांचा या कामांमधील उत्साह जराही कमी झालेला नाही. साठ टक्के लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर प्रत्येक हाताला आधी हक्काचा रोजगार द्या, त्यातून लोक शिक्षित होतील, त्यातून सुशिक्षित होतील, त्यातून सुंस्कारित होतील.. सांगताहेत विलास चाफेकर.

सध्याच्या पिढीकडे पाहिल्यावर मनात काय विचार येतात?
सध्याच्या पिढीत मला दोन प्रकार दिसतात. एक वर्ग असा आहे की खूप कमवा आणि खा, प्या, मजा करा. दुसरा एक वर्ग असा दिसतो, की आम्हाला समाजासाठी काही तरी करायचे आहे अशी त्यांची मनापासून धारणा असल्याचा अनुभव येतो. हे भान नव्या पिढीत नक्कीच वाढलेले दिसत आहे. समाजासाठी थोडे काही तरी काम करू या, अशी जाणीव त्यांच्यात दिसते. त्यामुळे ही पिढी काही तरी प्रतीकात्मक काम करत राहते. पण एकुणात दिशा न दिसणारी पिढी अशीच सध्याची अवस्था आहे. एखादे क्षेत्र कामासाठी निवडले की त्यात परिवर्तन आणायला काही वर्षे द्यावी लागतात. पण एवढा धीर आता कोणालाच नाही. म्हणून समाजासाठी काही तरी करायला तयार असणाऱ्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्यांची आणि योग्य दृष्टी असणाऱ्यांची आज खरी गरज आहे.

अशी दृष्टी असलेली माणसे आज मोठय़ा संख्येने नाहीत, ही समाजाची उणीव वाटते का?
नाही, मी तसे म्हणणार नाही. अशी माणसे नेहमीच कमी; अगदी मूठभरच असणार आणि ती मूठभरच राहणार. फक्त त्यांच्या विचारांचे आदान-प्रदान आम्ही कसे करणार, त्यांचे विचार आम्ही समाजापर्यंत कसे पोहोचवणार हा विचार झाला पाहिजे. ही माणसे संख्येने कमी असली तरी ती योग्य दिशा देऊ शकतात. त्यामुळेच मी आशावादी आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका सध्याच्या काळात काय असावी?
नव्या परिस्थितीत राजकीय पक्ष काय किंवा सामाजिक संस्था काय, यांना जुनी आव्हाने तर पेलायची आहेतच; पण समाजापुढे जे नवे प्रश्न निर्माण होत आहेत त्यांचाही विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांना समाजाचा विश्वास संपादन करावा लागेल. संस्थेत येऊन देणगी देणारे लोक आज पुष्कळ आहेत. पण कार्यकर्त्यांचे वर्तन आणि संस्थेचे काम असे असले पाहिजे की समाजाचा संपूर्ण विश्वास तुम्ही निर्माण करू शकला पाहिजे. म्हणून तरुण पिढीला ध्येय सुचवावे लागेल आणि मार्गही दाखवावा लागेल.

शहरीकरणाचा वेग आणि ग्रामीण भागाची दुरवस्था याकडे तुम्ही कसे बघता?
आपल्या देशात १९९० पासून नवीन आर्थिक धोरण आले. त्यानंतर देश खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला. मात्र झाले असे, की श्रीमंतच अधिक श्रीमंत झाले. खेडय़ापाडय़ातील ७० टक्के समाज जो दलित आहे, शेतमजूर आहे, भटका-विमुक्त आहे तो सर्व साधनांपासून आजही वंचितच आहे. स्त्रियादेखील उपेक्षितच आहेत. या सर्व समस्यांचे मूळ म्हणजे लोकांना पुरेसा आणि हक्काचा रोजगार नाही. एकदा रोजगार मिळाला की, आरोग्य, शिक्षण यासह सर्वच बाबी लोकांना मिळतील. मात्र त्यासाठी आधी रोजगार मिळणे आवश्यक आहे. म्हणून रोजगाराचा हक्क तयार झाला पाहिजे, असे माझे आग्रही मत आहे. नवीन आर्थिक धोरणालाही माझा विरोध नाही, मात्र शेतकऱ्याला अनुदान देणे हा काही समस्या सोडवण्याचा मार्ग नाही. त्या मलमपट्टय़ा आहेत.

मग शेतीचे प्रश्न नक्की कशाप्रकारे सोडवले जावेत?
देशातील उद्योगधंदे वाढले पाहिजेत. त्यातून भांडवल निर्मिती झाली पाहिजे ही चांगली गोष्ट आहे. पण उद्योग किती आणि कोणते, तर ज्यातून रोजगार वाढतील असे उद्योग सुरू झाले पाहिजेत आणि रोजगार वाढवणारे उद्योग म्हणजे शेती व शेतीपूरक धंदे. याच व्यवसायात रोजगार मोठय़ा संख्येने तयार होऊ शकतात. त्यासाठी सर्व ते साहाय्य करणे ही आजची खरी गरज आहे. म्हणून शेतीलाच उद्योग मानले गेले पाहिजे.