‘‘शिक्षणक्षेत्रात काम करायला लागलो आणि यशस्वी झालो, त्याचे श्रेय ‘वक्तृत्व’ या कलेला आहे. लोकसत्ताने आयोजित केलेला हा उपक्रम म्हणजे महाराष्ट्राची एक प्रकारची सेवाच आहे. या उपक्रमातून महाराष्ट्रातील वक्तृत्वाची परंपरा जोपासली जाईल,’ असे मत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी पुणे विभागीय अंतिम फेरीच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले. महाअंतिम फेरीही पुण्यातच घ्या. आम्ही आमचे ऑडिटोरियम देऊ,’ असेही आवाहन डॉ. एकबोटे यांनी यावेळी केले.
नाथे समूह प्रस्तुत आणि ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी झाली. डॉ. एकबोटे यांच्या हस्ते अंतिम फेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, उपप्राचार्य डॉ. श्यामकांत देशमुख, पृथ्वी एडिफाईसच्या आरोही जल्लापुरकर, आयुर्विमा महामंडळाचे यशवंत माळी, परीक्षक डॉ. रमेश पानसे, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. अरूणा ढेरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजनात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मोठे सहकार्य लाभले.
यावेळी एकबोटे म्हणाले, ‘‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशात त्यांच्या वक्तृत्व गुणांचा मोठा वाटा आहे. मॉडर्नची पुण्याई मोठी आहे. इथे निवडलेले स्पर्धक महाअंतिम फेरीतही यशस्वी होतील.’’
विजेते म्हणतात...
समृद्ध करणारा अनुभव!
प्रतिनिधी, पुणे
‘आव्हानात्मक विषय आणि समृद्ध करणारा अनुभव होता. स्पर्धा झाली.. निकाल जाहीर झाला..पण सगळं संपलं नाही. नवं काहीतरी शिकायला मिळालं,’ अशा शब्दांत विजेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘‘स्पर्धेचे विषय खूप छान व नावीन्यपूर्ण होते, तसेच स्पर्धेचे स्वरूपदेखील खूप आवडले. आज मला यायला उशीर झाला तरीदेखील आयोजकांनी मला खूप सहकार्य केले. विषय आव्हानात्मक असल्यामुळे स्पर्धेच्या या दुसऱ्या फेरीसाठी खूप अभ्यास आणि तयारी करावी लागली.’’
– नेहा देसाई (प्रथम क्रमांक)
‘‘स्पर्धा खूप छान होती. स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण जिल्हय़ातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मला अपेक्षा नव्हती की माझा क्रमांक येईल, त्यामुळे अधिकच आनंद होत आहे. स्पर्धेचे विषय विचार करायला लावणारे होते. स्पर्धेची अंतिम फेरी जर पुण्यात झाली असती तर आणखी छान वाटले असते.’’
– धनश्री केंढे (द्वितीय क्रमांक)
‘‘इतर वक्तृत्व स्पर्धापेक्षा या स्पर्धेत खूप फरक होता. या स्पर्धेचे विषय अधिक अभ्यासपूर्ण होते. सगळेच स्पर्धक उच्चस्तरीय आणि अभ्यासू होते. माझा तृतीय क्रमांक आल्याबद्दल मला अर्थातच खूप आनंद झाला आहे. दिग्गज परीक्षकांनी आम्हाला जोखलं, हे आमचं भाग्यच आहे.’’
– अक्षय पाटील (तृतीय क्रमांक)
‘‘मी महाविद्यालयात प्रथम वर्षांत असल्यापासून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत आहे. आजवरच्या प्रत्येक स्पर्धेने मला संघर्ष करणे शिकवले. पण या स्पर्धेने मला स्पर्धेचा आनंद कसा घेता येतो हे शिकविले. हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. अनुभवी आणि तज्ज्ञ परीक्षक असल्यामुळे खूप शिकायला मिळाले.’’
– सिद्धार्थ नाईक (उत्तेजनार्थ)