स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘या कुन्देन्दु तुषार हार धवला’ हे सरस्वती वंदनाचे रेंगाळणारे सूर.. वातावरण मंगलमय करणाऱ्या मधुकर धुमाळ यांच्या सनईवादनातून दरवळणारा ‘मुलतानी’चा गंध .. युवा गायिका रेवा नातू यांचे दमदार गायन.. डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांनी रंगविलेली जसरंगी जुगलबंदी.. तानांवर दाद देत कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या रसिकांचा अमाप उत्साह.. अशा वातावरणात ६१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवास सोमवारी प्रारंभ झाला.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित या महोत्सवाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. महोत्ससवासाठी रसिकांनी दुपारी तीन वाजल्यापासूनच न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेकडे येण्यास सुरुवात केली. त्यामुळे नवीन मराठी शाळेजवळील प्रवेशद्वारापाशी संगीतप्रेमींची रांग लागली होती. पं. रविशंकर, पं. एम. एस. गोपालकृष्णन, उस्ताद झिया फरीदुद्दीन डागर, जयमाला शिलेदार, मन्ना डे, शांता निसळ, शमशाद बेगम, वंदना दातार, विमल चोरघडे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, सतीश तारे आणि विनय आपटे या गेल्या वर्षभरातील दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महोत्सवाच्या रिवाजानुसार सनईच्या मंगलमय सुरांनी प्रारंभ करण्यात आला. ‘स्वदेस’ चित्रपटातील धूनमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मधुकर धुमाळ यांनी आपल्या सनईवादनाने रसिकांना आनंदाची अनुभूती दिली. ख्याल गायकी आणि तंत्र अंगाच्या मिलाफातून ‘मुलतानी’चा गंध आसमंतात भरून गेला. ‘मिश्र काफी’ रागवादनाने त्यांच्या मैफलीची सांगता झाली. या स्वरमंचावर प्रथमच कलाविष्कारासाठी आलेल्या रेवा नातू यांच्या गायनातून ग्वाल्हेर घराण्याचे सौंदर्य उलगडले. ‘पूरिया धनाश्री’ रागानंतर त्यांनी ‘हमीर’ रागातील बंदिश सादर केली. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या संत पुरंदरदास यांच्या कन्नड भजनाने त्यांनी पदार्पणातच रसिकांनाजिंकले.
शास्त्रीय संगीतातील ‘मूर्छना’ या तत्त्वावर आधारित जसरंगी जुगलबंदीतून श्रोत्यांना दोन घराण्याच्या कलाकारांनी गुंफलेल्या सुंदर मैफलीची प्रचिती आली. जयपूर घराण्याच्या डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी ‘अभोगी’ आणि मेवाती घराण्याचे संजीव अभ्यंकर यांनी ‘कलावती’ रागाचे गायन करीत संगीतप्रेमींना संगीतातील अद्वैताचा आनंद दिला. उस्ताद निशात खाँ यांच्या गायकी अंगाच्या सतारवादनातून इमदाद खानी घराण्याची वैशिष्टय़े उलगडली. पं. अनिंदो चटर्जी यांच्या तबल्याच्या साथीने या मैफलीची रंगत वाढत गेली. ज्येष्ठ गायक संगीत मरतड पं. जसराज यांच्या गायनाने सोमवारच्या सत्राची सांगता झाली.
महोत्सवात आज
– वसीम अहमद खाँ (गायन)
– पं. उल्हास बापट (संतूर)
– शोवना नारायण (नृत्य)
– परवीन सुलताना (गायन)
कलेने केली रोगावर मात
वादन करताना सनईच्या प्रारंभीचे टोक घासून झालेली दाढेला जखम.. या जखमेचे कर्करोगामध्ये झालेले पर्यावसन.. शस्त्रक्रिया केल्यानंतर सनईवादन करू नये असा डॉक्टरांनी दिलेला सल्ला.. सनईला छिद्र असलेली लोखंडी रिडची पट्टी लावून हवा वाद्यामध्ये केलेला बदल.. या बदलामुळे वाद्यातून हवा जात असल्याचे ध्यानात येताच केवळ दोन महिन्यांत आत्मविश्वासाने पुन्हा सुरू केलेले सनईवादन.. धुमाळ यांच्या या ‘मधुकर’ वृत्तीला ‘सलाम’ करीत रसिकांनी त्यांच्या सनईवादनाचा आनंद लुटला. कलेने रोगावर मात केली आणि प्रतिकूलतेतूनही अनुकूल करता येते ही तालीमच जणू धुमाळ यांनी दिली. त्यांच्या मातोश्री चंद्राबाई धुमाळ या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. वडिलांकडून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मधुकर यांनी मुंबईला जाऊन पं. लक्ष्मीप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची आणि पं. राजाराम शुक्ल यांच्याकडून बनारस घराण्याच्या वादनाची तालीम घेतली. आकाशवाणीचे कलाकार असलेल्या धुमाळ यांनी १९९२ मध्ये स्वतंत्र वादन केले. चित्रपटसृष्टीमध्ये संगीतकार सनईवादनासाठी आपल्यालाच पाचारण करतात, असे त्यांनी सांगितले.
नाइट लॅम्पवर कलाकारांची छबी
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, बेगम अख्तर, गानसरस्वती किशोरी आमोणकर, डॉ. प्रभा अत्रे, उस्ताद बिस्मिल्ला खाँ, पं. जसराज, पं. कुमार गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे या शास्त्रीय संगीतातील श्रेष्ठ कलाकारांची छबी असलेली नाइट लॅम्पसाठी अर्धवर्तुळाकार पट्टिका (हाफ शेड) असलेले दालन रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. लोखंडी सांगाडय़ावर फायबर शीट आणि फॅब्रिकच्या माध्यमातून याअर्धवर्तुळाकार पट्टिकेची निर्मिती केली असून त्यावर नैसर्गिक रंगांनी चितारलेली कलाकारांची छबी पाहण्यास मिळते. हा पट्टिका धुता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती पद्मजा भिडे-लाखे यांनी दिली.