शिक्षण हक्क कायद्याच्या पंचवीस टक्के आरक्षित जागांच्या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ अद्यापही कायम आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ सुरूच होत नाही, अनेक मदत केंद्रांवर स्कॅनर्स नाहीत, मदत केंद्रांवर अधिकारी उपस्थित नसतात आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळत नाही.. असा पालकांच्या तक्रारींचा पाढा कायम आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेच्या प्रवेशाच्या वयाचा गोंधळही कायम असल्यामुळे पालक हैराण झाले आहेत.
शिक्षण विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पंचवीस टक्के आरक्षित जागांची प्रवेश प्रक्रिया गेल्या वर्षीपासून ऑनलाइन केली. या वर्षीही गेल्या वर्षीप्रमाणेच प्रवेश प्रक्रियेत गोंधळाची परंपरा विभागाने कायम ठेवली आहे. २७ फेब्रुवारीपासून सुरू होणे अपेक्षित असणारी प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरळीत झालेली नाही. संकेतस्थळ सुरू होण्यात अडचणी येत असल्याची पालकांची पहिल्या दिवसापासूनच तक्रार आहे. कागदपत्रे, फोटो अपलोड होत नाहीत, तासभर धडपड करूनही संकेतस्थळ सुरूच होत नाही, अशा तक्रारी पालक करत आहेत.
पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि त्यांना अर्ज भरण्यासाठी मदत व्हावी म्हणून शिक्षण विभागाने मदत केंद्रं सुरू केली. मात्र, मदत केंद्रही नामधारीच असल्याचे दिसत आहे. मदत केंद्रांवर पालकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. टोकन घेऊनही दिवसभर नंबर लागत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. अनेक केंद्रांवर स्कॅनर नाहीत, त्यामुळे कागदपत्रे, फोटो स्कॅन करून सीडी घेऊन येण्याच्या सूचना केंद्रांवर पालकांना दिल्या जात आहेत.
गेल्या वर्षीप्रमाणेच वयाचा गोंधळही कायम आहे. हवी ती शाळा मिळण्यासाठी पालकांना आपल्या मुलांना पुन्हा एकदा नर्सरीच्याच वर्गात बसवण्याची वेळ आली आहे. काही महिन्यांच्या फरकाने वयात फरक पडत असल्यामुळे हवी त्या शाळेचा पर्यायच भरता येत नसल्याची पालकांची तक्रार आहे. शिक्षण विभागाच्या या गोंधळामुळे पालक मात्र हैराण झाले आहेत.
पूर्वप्राथमिकची प्रवेश क्षमता कमी
या वर्षी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्वप्राथमिकच्या वर्गाची प्रवेश क्षमता ही ५ हजार १७८ आहे आणि प्राथमिक म्हणजे पहिलीची प्रवेश क्षमता ८ हजार ३०१ आहे. पालकांचे प्राधान्य हे पूर्वप्राथमिक वर्गापासूनच प्रवेश घेण्यासाठी असते. मात्र, या वर्षी प्रवेश क्षमता कमी झाल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘‘पालकांना आदल्या दिवशी केंद्रांवर टोकन दिले जाते. मात्र, दोन दोन दिवस प्रत्यक्ष प्रवेश होतच नाहीत. केंद्रांवर पालकांना मदतच मिळत नाही. अनेक केंद्र बंदच आहेत. सकाळी १० ते ५ या कालावधीत केंद्र सुरू असणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक केंद्र पूर्ण वेळ सुरू नसतात.’’
– सोनाली कुंजीर, कागद काच, पत्रा, कष्टकरी पंचायत