प्रत्येक पाच शाळांमागे एक ‘पोलीस काका’

शाळा, महाविद्यालयाच्या आवारात आणि परिसरात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, तसेच युवतींची छेड काढणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांकडून ‘पोलीस काका’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पोलीस काका’ उपक्रमाअंतर्गत पोलिसांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली असून पुढील आठवडय़ात या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात येईल.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांवरील झालेले हल्ले, तसेच त्यांची सुरक्षितता विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून ‘बडी कॉप’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालय तसेच शाळांच्या आवारात गैरप्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांकडून या प्रकाराची माहिती पालक तसेच शिक्षकांना देण्यात येत नाही. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाडस वाढते. विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे पोलिसांशी संवाद साधता यावा, या उद्देशाने ‘पोलीस काका’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला कर्मचारी रसिला राजू हिचा माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील रखवालदाराकडून खून करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून बडी कॉप हा उपक्रम सुरु करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला रात्री-अपरात्री कामावरुन निघतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी बडी कॉप हा उपक्रम सुरु केला. हिंजवडी, मुंढवा, येरवडा या पोलीस ठाण्यांमध्ये हा  उपक्रम सुरु करण्यात आला असून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचा व्हॉटसअ‍ॅप समूह तयार करण्यात आला आहे. महिलेने तक्रार केल्यास पोलिसांकडून त्वरित कारवाई करण्यात येते. महाविद्यालयीन युवती तसेच शाळकरी मुलींसाठी ‘पोलीस काका’ हा उपक्रम सुरु करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. ‘पोलीस काका’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येक पाच शाळांमागे एक ‘पोलीस काका’ अशी योजना आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.

प्रत्येक शाळेत पोलीस काकांचा मोबाईल क्रमांक

शहरातील प्रत्येक शाळेच्या आवारात  ‘पोलीस काकां’चा मोबाईल क्रमांक लावण्यात येणार आहे. महाविद्यालयांच्या आवारात घडणारे रॅगिंगसारखे प्रकार किंवा एखाद्याने त्रास दिल्यास युवक तसेच युवती त्वरित ‘पोलीस काकां’च्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. सध्या पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. पुढील आठवडय़ापासून हा उपक्रम सुरु करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

टोळक्यांवर जरब बसवा

शहराच्या मध्यभागातील अनेक शाळा तसेच महाविद्यालयांच्या बाहेर टोळकी थांबतात. अनेक जण शाळेत किंवा महाविद्यालयात देखील नसतात. शाळकरी मुलींचा पाठलाग करणे, त्यांची छेड काढणे असे प्रकार सर्रास होतात. मात्र, घाबरलेल्या मुली या प्रकाराची वाच्यता पालक अथवा शिक्षकांकडे करत नाहीत, त्यामुळे टोळक्यांचे फावते. ‘पोलीस काकां’नी अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलांना धडा शिकवून त्यांना जरब बसविण्याची गरज आहे. वीस वर्षांपूर्वी एका ‘डॅशिंग’ अधिकाऱ्याने फग्र्युसन रस्त्यावर थांबणाऱ्या टोळक्यांना धडा शिकवला होता. त्या अधिकाऱ्याची दहशत एवढी होती की फग्र्युसन रस्त्यावर त्या वेळी कोणी थांबत नसे. अनेक शाळांच्या बाहेर टोळकी थांबलेली असतात, हे पोलिसांना देखील माहिती असते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून टोळक्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.