विज्ञानाच्या प्राध्यापकांशी मुक्त संवाद आणि व्याख्यानांची मेजवानी, विज्ञान प्रदर्शनांमध्ये स्वत: प्रयोग करून पाहण्याचा घेतलेला आनंद आणि पुण्यात संशोधनविषयक कार्य करणाऱ्या नामांकित संस्था आतून पाहण्याची सुवर्णसंधी अशा विविध कार्यक्रमांनी शहरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी’मध्ये हवामानाशी संबंधित विविध शास्त्रांची ओळख शालेय विद्यार्थ्यांनी करून घेतली. झाडांच्या खोडांच्या अभ्यासावरून पूर्वीच्या हवामानाचा अंदाज बांधण्यापासून सध्या कार्यरत असलेल्या हवेची गुणवत्ता सांगणाऱ्या ‘सफर’ या प्रणालीपर्यंतची माहिती विद्यार्थ्यांना खुद्द संशोधकांकडूनच घेता आली. ‘नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘आयसर’चे प्रो. सुनील मुखी आणि खोडदच्या ‘जीएमआरटी’ महादुर्बिण यंत्रणेचे अधिष्ठाता प्रो. यशवंत गुप्ता यांचे विचार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाले.
विविध शाळांमध्येही विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे केंब्रिज शाळेत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना ऊर्जानिर्मितीचे विविध प्रकार, पाण्याचा पुनर्वापर, प्रदूषण नियंत्रण अशा विषयांवरील प्रकल्प बघायला मिळाले. ‘निमिष’ या संस्थेतर्फे मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानांमधून जैव तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील मधुरा मोहोळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी सहायक समितीतर्फे विज्ञान दिनाच्या निमित्ताने सायन्स क्लब सुरू करण्यात आला. या क्लबच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव देव यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयातर्फेही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. रत्नाकर भेलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.