विज्ञान कथा साहित्याविषयी समाजात गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून त्याच्याच जोडीला विज्ञान कथा समीक्षकही निर्माण झाले पाहिजेत, असे मत रविवारी भावे स्कूल येथे झालेल्या ‘साय-फाय कट्टा’ या कार्यक्रमातील परिसंवादात व्यक्त करण्यात आले. ‘साय-फाय कट्टा’ ही संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून निर्माण झाली असून त्यात विज्ञान कथा लेखनाचे प्रशिक्षण दिले जाते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां.देशपांडे होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे, विज्ञान लेखक निरंजन घाटे, विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांनी मार्गर्दर्शन केले. साय-फाय कट्टय़ाच्या माहितीचे सादरीकरण आकाश होगाडे यांनी केले. सूत्रसंचालन मेघश्री दळवी व शरद पुराणिक यांनी केले. स्मिता पोतनीस, नील आर्ते व प्रसन्न करंदीकर या यांनी विज्ञान कथा सादर केल्या. साय-फाय कट्टय़ाचे सध्या २८ सदस्य आहेत व त्यातील काही जण आता यशस्वीपणे विज्ञान कथा लिहू लागले आहेत. scifikatta.blogspot.in   हा या कट्टय़ाचा ब्लॉग पत्ता आहे.
अ.पां.देशपांडे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितले, की विज्ञान कथा लेखन ही जशी गरज आहे, तशी विज्ञान कथा समीक्षक तयार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, तसे समीक्षक घडवण्याचा प्रयत्न आम्ही २०१४-१५ मध्ये एसएनडीटी विद्यापीठात केला होता. ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी सांगितले, की मराठीतील विज्ञान साहित्याकडे केवळ ते दुबरेध असते म्हणून दुर्लक्ष केले जाते, हे थांबवण्यासाठी समाजात त्याविषयी जागरूकता निर्माण केली पाहिजे. विज्ञान कुतूहल हे लोकांमध्ये असले पाहिजे व ते प्रत्येकात असते पण आपल्याकडे विज्ञान कथा साहित्याला म्हणावी तशी समाजमान्यता मिळाली नाही. साय-फाय कट्टय़ाच्या रूपाने आता नव्या कल्पना घेऊन विज्ञान कथा लेखक घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 विज्ञान कथालेखनाला साहित्याचा दर्जा फारसा मिळत नाही कारण त्यात जीवन दर्शनाचे सामथ्र्य नसते, असे ह.मो.मराठे यांनी सांगितले. त्यावर विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांनी विज्ञान कथांमध्ये जीवनाचे दर्शन निश्चितच असते असा दावा केला. विज्ञान कथेत जे शक्य असू शकते व जे माहीत आहे, त्यावरच कथाबीज आधारित असते. त्यात जीवनाचे प्रतिबिंबही असते. त्यामुळे विज्ञानातील प्रगतीच्या आधारे पुढील काळात होऊ शकणारे बदल व त्यात कथाभागाची केलेली रचना असे स्वरूप असते, असे ते म्हणाले.