पुणे महापालिकेच्या ‘इनडोअर व्हेक्टर प्रोग्रॅम’ला यश; ७७ स्थळे घोले रस्ता परिसरात

डासोत्पत्ती स्थळांच्या शोधासाठी पालिकेने हाती घेतलेल्या ‘इनडोअर व्हेक्टर प्रोग्रॅम’चा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाला असून त्यात पहिल्याच दिवशी डासांची वाढ झालेली १६६ ठिकाणे सापडली आहेत. यातील सर्वाधिक- म्हणजे ७७ डासोत्पत्ती स्थळे घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात येणाऱ्या भागात आहेत.

डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली असून सोमवारी एकाच दिवशी ९० डेंग्यूसदृश रुग्णांचीही नोंद झाली आहे. यातील ३३ रुग्णांच्या चाचण्या ‘सेंटिनेल’ प्रयोगशाळांमधूनही ‘पॉझिटिव्ह’ आल्या आहेत. चिकुनगुनियाचेही ६० रुग्ण सोमवारी आढळले आहेत.

घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या भागात घोले रस्ता, फग्र्युसन रस्ता, चतु:शृंगी रस्ता, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, जनवाडी, पांडवनगर, हेल्थ कँप वसाहत, विद्यापीठ रस्ता, भोसलेनगर हे भाग येतात. जंगली महाराज रस्ता व शिवाजीनगर गावठाणाचा काही भागही त्यातच मोडतो. सोमवारी या ठिकाणच्या १,५१७ ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी ७७ ठिकाणी डासांची वाढ झालेली सापडली. त्याखालोखाल ढोले-पाटील रस्ता, वारजे, कोंढवा-वानवडी, कोथरूड, नगर रस्ता, टिळक रस्ता व बिबवेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गतही तपासण्या झाल्या असून शहरात डासांची एकूण १६६ उत्पत्तिस्थळे सापडली आहेत.

उपाययोजना करावी

डेंग्यू व चिकुनगुनियाच्या आजारांसाठी आजारांसाठी अतिशय सक्षम सर्वेक्षणाची आवश्यकता आहे. ताप रुग्णांच्या सर्वेक्षणाबरोबरच घरोघरी केले जाणारे कीटकशास्त्रीय सर्वेक्षणही महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर एकात्मिक कीटक व्यवस्थापन व्हायला हवे. जी डबकी बुजवणे शक्य नाही तिथे गप्पी मासे सोडणे, कुठेही पाणी साचू न देणे, याबरोबरच डासांपासून वैयक्तिक संरक्षणही गरजेचे आहे.

शहरे व शहराच्या बाहेरील भागात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी डासांची वाढ टाळण्यासाठी नियमावली बनवणे व ती सक्तीने पाळणे आवश्यक आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालकन डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

शहरातील ६२ रुग्णालयांना, महापौर व आयुक्त यांनी बैठक घेऊन डेंग्यू व चिकुनगुनियाच्या चाचण्या सहाशे रुपयांत करून देण्याबद्दल आवाहन केले आहे.

– डॉ. अंजली साबणे, पालिकेच्या आरोग्य उपप्रमुख. 

डासांसाठी धूर फवारणी (फॉगिंग) करण्याची नेहमी मागणी होत असली तरी तो तात्पुरता उपाय असून त्याचा फायदा होण्याऐवजी उलट परिणाम होण्याचीही शक्यता असते. डेंग्यूचा डास घराच्या आत अंधाऱ्या जागांमध्ये राहतो. त्यामुळे फॉगिंग करायचे असेल तर ते घराबाहेर नव्हे, तर घरात करावे लागेल. बाहेर फॉगिंग केल्यामुळे उलट बाहेरचे डास आत शिरण्याची शक्यता असते. हा डास सकाळी व संध्याकाळी अंधार होण्यापूर्वी चावतो. त्यामुळे त्या वेळांना व घरात फॉगिंग केले तर फॉगिंगचा उपयोग होईल.

– डॉ. प्रदीप आवटे, सहायक संचालक, राज्य आरोग्य विभाग