कोथरूड येथील महात्मा सोसायटीतील तीन मजली बंगल्याला सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत तळमजल्यावर साठलेल्या धुरामुळे गुदमरून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तर जीव वाचविण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून एका महिलेने उडी मारल्यामुळे जखमी झाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत तीन जणांची सुखरूप सुटका केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता अग्निशामक दलाच्या जवानांनी व्यक्त केली.
शरयू मधुसूदन मुरुदगन (वय ७७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांची सून स्वाती जयंत मुरुदगन (वय ४४) यांनी उडी मारल्यामुळे त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत मुरुदगन हे व्यावसायिक आहेत. महात्मा सोसायटीत त्यांचा तीन मजली बंगला आहे. या तळमजल्यावर त्यांच्या आई शरयू राहत होत्या. तर, त्यांच्या दोन मुली व पती-पत्नी हे दुसऱ्या मजल्यावर राहत होते. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास बंगल्यातून मोठय़ा प्रमाणावर धूर येऊ लागला. नागरिकांनी हे पाहून अग्निशामक दलास फोन केला. अग्निशामक दलाचे केंद्र प्रमुख राजेश जगताप, गजाजन पाथरुडकर यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी आगीने बंगल्याला वेढले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पाहून आणखी पाण्याचे टँकर मागविले. बंगल्यातून मोठय़ा प्रमाणावर धूर येत असल्यामुळे आतमध्ये किती नागरिक अडकले आहेत, याचा अंदाज येत नव्हता. अग्निशामक दलांनी तळमजल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, त्या वेळी त्यांना शरयू या बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या. आग लागल्यानंतर समजल्यानंतर जीव वाचविण्यासाठी स्वाती या तिसऱ्या मजल्यावर पळाल्या. त्यांनी त्या ठिकाणाहून खाली उडी मारली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. शरयू व स्वाती यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णलायात दाखल करण्यात आले.
जगताप यांनी सांगितले, की अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्याची काच फोडून जयंत व त्यांच्या दोन मुलींना सुखरूप बाहेर काढले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्धा तासात आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असण्याचा अंदाज आहे.