महिलेचा मृत्यू; भागीदाराविरुद्ध गुन्हा

भागीदारीत सुरु केलेल्या खासगी वित्तीय संस्थेच्या भागीदाराकडून फसवणूक झाल्यानंतर व्यावसायिक, त्याचा मुलगा आणि पत्नीने झोपेच्या गोळ्या खाऊन  तसेच मनगटाच्या शिरा ब्लेडने कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची  धक्कादायक घटना चिंचवड भागात घडली. शनिवारी (२१ ऑक्टोबर) रात्री ही घटना उघडकीस आली. बेशुद्धावस्थेतील महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. व्यावसायिक आणि त्याच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान,आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भागीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अश्विनी सुधीर पवार (वय ६३, रा. गुरुराज अपार्टमेंट, पवनानगर, चिंचवड)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत पती सुधीर (वय ६९)आणि मुलगा रोहित (वय ३०) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिंचवड भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पवार कु टुंबीयांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भागीदार सौमित कृष्णाचंद सक्सेना (वय ३७, रा. विमल गार्डनसमोर, पिंपळे सौदागर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोहितने यासंदर्भात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौमितने शुभंकरोती फायनान्स कंपनी सुरु केली होती. या कंपनीत सुधीर पवार भागीदार होते. सौमितने कंपनीचे सर्व व्यवहार स्वत:कडे ठेवले होते. ही कंपनी तोटय़ात चालली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. सेबीने कंपनीला नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर सौमित घराला टाळे लावून कुटुंबासह पसार झाला होता.

पवार यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,सौमितने त्याचा मोबाईल क्रमांक बंद करुन ठेवला होता. त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे पवार तणावाखाली होते. दरम्यान, शुभंकरोती फायनान्स कंपनीत गुंतवणूक केलेल्यांनी पवार यांच्याकडे रक्कम परत करण्यासाठी तगादा लावला होता. गुंतवणूकदारांच्या तगाद्यामुळे पवार चिंताग्रस्त होते. त्यामुळे त्यांनी पत्नी अश्विनी आणि मुलगा रोहित यांच्यासह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

पवार, त्यांची पत्नी अश्विनी आणि मुलगा रोहित यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या तसेच त्यांनी ब्लेडने मनगटाच्या शिरा कापून घेतल्या. शनिवारी (२२ ऑक्टोबर) पवार यांचा पुतण्या रणवीर हा त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत होता. प्रतिसाद न मिळाल्याने तो शनिवारी सायंकाळी चिंचवडमध्ये आला. तो पवार राहात असलेल्या गुरुराज अपार्टमेंटमध्ये गेला. त्याने सदनिकेचा दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्याने अग्निशमन दल तसेच पोलिसांशी संपर्क साधला. दरवाजा तोडल्यानंतर पवार, त्यांची पत्नी आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी तातडीने तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अश्विनी पवार यांचा मृत्यू झाला होता. अत्यवस्थ असलेल्या रोहितने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार सौमितविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक यु.पी.देशमुख तपास करत आहेत.