सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नेमके काय वाचायचे हे समजून घेण्यासाठी आणि पत्रकारितेतील मराठी भाषेची अवस्था बिकट होत असताना गोविंद तळवलकरांचे अग्रलेख आणि त्यांच्या लेखनशैलीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. संपादक हा लोकशिक्षक असतो, अशी भावना असणाऱ्या काळात त्यांनी खरोखरच त्या भूमिकेत संपादक म्हणून काम केले, अशी भावना तळवलकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत बुधवारी व्यक्त करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाच्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. प्र. ना. परांजपे, प्रसन्नकुमार अकलूजकर, विनोद शिरसाठ, अरविंद व्यं. गोखले, आल्हाद गोडबोले, सुभाष नाईक, अभय टिळक, पराग करंदीकर, प्रा. विश्राम ढोले, सुनील देशपांडे यांची या सभेत श्रद्धांजलीपर भाषणे झाली.

तळवलकर यांच्या लिखाणाने महाराष्ट्रात प्रबोधनाचे वारे सुरू झाले असे सांगून डॉ. परांजपे म्हणाले, ‘‘तळवलकरांना माणसांची चांगली पारख होती. त्यांचे लेखन, वाचन चौफेर असल्याने बसल्या जागी त्यांना सर्व विषयांची माहिती असे. त्यांच्या लेखनशैलीचा अभ्यास केल्यास नवोदित पत्रकारांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील.’’

शिरसाठ म्हणाले, ‘‘१९९६ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर ते अमेरिकेला गेले. त्यानंतर २००७ मध्ये दोन महिन्यांकरिता ते पुण्यात आले होते, तेव्हा त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर साधना, मी आणि तळवलकर असे एक समीकरणच झाले. गेल्या दहा वर्षांत ‘साधना’मध्ये त्यांचे तब्बल १७० लेख प्रसिद्ध झाले.

त्यांची अभिजन अशी एक प्रतिमा समाजात आहे. परंतु तळवलकर त्या पलीकडचे आहेत.’’

‘‘त्यांची लिखाणाची पद्धत तर्कशुद्ध आणि सयुक्तिक होती आणि त्यासाठीच ते ओळखले जात,’’ असे अकलूजकर यांनी सांगितले.

टिळक म्हणाले, ‘‘संपादक हा लोकशिक्षक असतो असे समजले जात असे त्या काळात तळवलकर संपादक होते आणि खरोखरीच ते त्या भूमिकेत जगले. रुढार्थाने त्यांचे राजकारण्यांशी संबंध नव्हते. परंतु राजकारणातील लहान-लहान बाबी त्यांना ठाऊक असत.’’