25 May 2016

‘किस्त्रीम’ चे माजी संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘किस्त्रीम’चे (किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’) माजी संपादक मुकुंदराव शंकर किर्लोस्कर (वय

प्रतिनिधी, पुणे | March 1, 2013 1:45 AM

ज्येष्ठ पत्रकार आणि ‘किस्त्रीम’चे (किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’) माजी संपादक मुकुंदराव शंकर किर्लोस्कर (वय ९१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुकंदराव किर्लोस्कर यांचा जन्म तीन मार्च १९२१ रोजी किर्लोस्करवाडी (जि. सांगली) येथे झाला. सोलापूरच्या हरीभाई देवकरण प्रशाला येथून मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम. ए. पदवी संपादन केली. १९४३ मध्ये ‘शंवाकि’ यांनी स्थापन केलेल्या ‘किर्लोस्कर’ मासिकामध्ये ते रुजू झाले. किर्लोस्कर ब्रदर्स लि. या कंपनीची मालकी ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’ आणि ‘मनोहर’ असलेल्या या मासिकांनी मराठी मनावर अधिराज्य केले. शंवाकि निवृत्त झाल्यानंतर १९५८ मध्ये मुकुंदराव या मासिकांचे संपादक झाले. मुकुंदरावांनी जवळपास चार दशके ‘किस्त्रीम’ची धुरा यशस्वीपणे सांभाळली. अफाट लोकसंग्रह असलेले मुकुंदराव हे वाचकांच्या पत्रांना आवर्जून उत्तरे देत असत. त्यांच्या पत्नी शांताबाई किर्लोस्कर या ‘स्त्री’ मासिकाच्या संपादक होत्या. ह. मो. मराठे, विद्या बाळ, श्री. भा. महाबळ, दत्ता सराफ, एकनाथ बागूल, सुधीर गाडगीळ यांसारखे पत्रकार आणि लेखक ‘किस्त्रीम’च्या तालमीत तयार झाले. १९७३ मध्ये ‘मनोहर’ मासिकाचे साप्ताहिकामध्ये रूपांतर झाले, त्याचे वाचकांनी स्वागत केले.
मुकुंदरावांनी लिहिलेल्या संपादकीयाचा ‘पेरणी’ हा संग्रह प्रसिद्ध आहे. प्रवास आणि फोटोग्राफी हे त्यांचे आवडते छंद होते. किर्लोस्कर ब्रदर्स लि. चे संचालकपद भूषविलेले मुकुंदराव हे इंडियन ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटीचे उपाध्यक्ष होते. डॉ. अनिल अवचट, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, राजन खान, मिलिंद बोकील, भानू काळे, सदानंद देशमुख, मुकुंद टाकसाळे, देवयानी चौबळ, निळू दामले, अशोक पाध्ये यांसारख्या लेखकांचे पहिलेवहिले लेखन प्रसिद्ध करून त्यांना नावारूपाला आणण्यामध्ये मुकुंदरावांचे योगदान होते. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि ‘अंतर्नाद’ मासिकातर्फे १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या नियतकालिकांच्या संपादकांच्या बैठकीला मुकुंदराव आवर्जून उपस्थित होते. ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही आपण नियतकालिकाची वाटचाल यशस्वीपणे पुढे नेऊ शकतो’, असा विश्वास देत त्यांनी सर्व संपादकांना मार्गदर्शन केले होते.

First Published on March 1, 2013 1:45 am

Web Title: senior journalist mukundrao kirloskar passed away