‘ ‘कटय़ार काळजात घुसली’ हे नाटक जन्माला येतानाच पाठीवर थाप घेऊन आले होते. पं. वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर या नाटकाचे ५३५ प्रयोग करण्याची संधी मला मिळाली. ‘हाऊसफुल्ल’चा फलक या नाटकाने कधी काढलाच नाही. गेल्या पन्नास वर्षांत तसे दुसरे नाटक झाले नाही आणि पुढील पन्नास वर्षे होईल याची शाश्वती नाही. ‘कटय़ारपर्व’ हे माझ्यासाठी ‘सुवर्णपर्व’ होते!,’ अशा शब्दात ज्येष्ठ गायिका अभिनेत्री फैयाज यांनी आपल्या भावना बुधवारी व्यक्त केल्या.
‘लागी करेजवा कटार’, ‘नाहक झाले मी बदनाम’, ‘चार होत्या पक्षिणी त्या’ अशा एकाहून एक सरस नाटय़पदांपासून ‘पाडाला पिकलाय आंबा’ आणि ‘गेल्या महिन्याचा हफ्ता थकला’ अशा लोकप्रिय लावण्यांपर्यंतची फैयाज यांची कारकीर्द त्यांच्याच गायकीतून उलगडली आणि त्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
‘पुणे भारत गायन समाज’तर्फे दिला जाणारा ‘कै. सौ. वसुंधरा पंडित पुरस्कार’ ज्येष्ठ गायक अभिनेते पं. रामदास कामत यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका फैयाज यांना प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष शैला दातार या वेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर रवींद्र खरे यांनी त्यांची मुलाखत घेतली. फैयाज यांनी या वेळी नाटकातील काही पदे सादर केली. संजय गोगटे (हार्मोनियम) आणि विद्यानंद देशपांडे (तबला) यांनी साथसंगत केली.
वसुंधरा पंडित यांच्याविषयी फैयाज म्हणाल्या, ‘धनाढय़ लोक अनेक असतात, पण पंडित कुटुंबीयांकडे दानत होती. त्यांच्या ‘आशियाना’ या निवासस्थानी अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांची कला सादर केली. वसुंधराताई आणि पंडित कुटुंबीय पुण्याचे भूषण आहेत.’ आपल्या कारकिर्दीबद्दल त्या म्हणाल्या, ‘लहानपणी मी मेळ्यांमध्ये काम करत असे. आईकडून मला गाण्याचे अंग मिळाले पण माझी गायन व नृत्याची आवड आजीने जाणली. मला प्रथम ‘तुझे आहे तुजपाशी’मध्ये भूमिका करण्याची संधी मिळाली. चेहऱ्याला तेव्हा रंगाचा जो स्पर्श झाला तो आजही कायम आहे. ‘कटय़ार’ १९६८ मध्ये सुरू झाले आणि त्याचे भरभरून कौतुक झाले. ‘कटय़ारपर्व’ हे माझ्यासाठी ‘सुवर्णपर्व’च होते. मी नेहमी विद्यार्थीदशेत असते, प्रत्येक कलावंताने तसे राहावे असे वाटते.’