ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ प्रो. सुलोचना गाडगीळ यांना पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे नुकताच लाईफ टाईम एक्सलन्सपुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आले. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) प्रभावात होणाऱ्या बदलांविषयी विशेष अभ्यास असलेल्या गाडगीळ यांच्याशी लोकसत्ताने संवाद साधला.

  • गेल्या पन्नास वर्षांत मान्सून बदलला का? हे बदल कोणते?

आपल्याकडे मान्सूनचा १८७६ पासूनची माहिती उपलब्ध आहे. जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण देशात पडणाऱ्या सरासरी पावसाचा विचार केल्यास मुख्यत्वे वर्षांवर्षांतील बदल (इयर टू इयर चेंज) दिसून येतात. भारतावरील सरासरी पाऊस ८५ सेमी असतो आणि त्याचे सामान्य विचलन (स्टँडर्ड डेव्हिएशन) हे त्याच्या १० टक्के (म्हणजे ८.५ सेमी) असते. पावसात सरासरीपेक्षा १० टक्क्य़ांहून अधिक तूट असेल तर त्याला अवर्षण म्हणतात आणि १० टक्क्य़ांपेक्षा जास्त असेल तर त्याची गणना अतिवृष्टीत होते. अवर्षण, बेताचा पाऊस आणि अतिवृष्टी हे वर्षांवर्षांतील बदल दिसतच असतात. केवळ दशकांचा विचार केल्यास काही दशके अवर्षण कमी असते व काही दशकांमध्ये अधिक असते. त्याचा जागतिक हवामानबदलाशी संबंध नाही. १९३२ पर्यंतच्या तीन दशकांमध्ये भरपूर अवर्षण होते. १९३२ ते १९६४ च्या दरम्यान मात्र खूपच कमी अवर्षण होते व पुन्हा १९६५ ते १९८७ दरम्यान अनेक अवर्षणे झाली. १९८८ ते २००२ अवर्षण पडले नाही, पण पुन्हा २००२, २००४, २००९ आणि २०१४-१५ मध्ये अवर्षण होतेच. जागतिक हवामानबदल मात्र शंभर वर्षांच्या टप्प्यातील बदल असतो. त्या हिशेबात आपल्या मान्सूनवर काहीही परिणाम झालेला नाही व तो अपेक्षितही नाही. जागतिक तापमानवाढीबद्दल खूप बोलले जाते व त्याचा मान्सूनवर परिणाम होईल असे म्हणणे काही प्रमाणात शास्त्रज्ञांच्याही सोईचे असते. परंतु अवर्षण ते अतिवृष्टी हे बदल का होतात व त्याचे भाकीत करता येईल का, हे अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत.

  • ‘एल-नीनो’ असल्यावर पाऊस कमी होईल असे म्हणतात, या वर्षी त्याच्या उलट असलेली ‘ला-नीना’ स्थिती निर्माण होण्यास उशीर होईल की काय, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. यंदाच्या पावसाचे काय?

‘एल नीनो’ ही घटना दर ४-५ वर्षांनी घडते व ती शेकडो वर्षे घडत आहे. ही स्थिती असताना अवर्षणाची शक्यता वाढते. गतवर्षी हवामानखात्याने एप्रिलमध्येच अवर्षणाची शक्यता सामान्यापेक्षा दुप्पट असल्याचे सांगितले होते. जूनमध्ये ही शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले. हे भाकीत बरोबरही ठरले. हवामानशास्त्रातील प्रगतीमुळे ‘एल नीनो’ विषयी गेल्या १०-१५ वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे अंदाज वर्तवता येऊ लागला आहे. यंदा आता ‘ला नीना’ स्थिती सुरु झाली आहे. विषुववृत्तीय मध्य प्रशांत सागरावर दाट मेघमालिका असल्यास ‘एल नीनो’ असतो व ती स्थिती प्रतिकूल मानली जाते. सध्या मात्र प्रशांत महासागरावरील स्थिती अनुकूल असून पाऊस सरासरीपेक्षा अधिक होण्याची दाट शक्यता आहे.

  • हवामानखात्याने वर्तवलेला अंदाज नेहमी का चुकतो, अशी शंका सामान्यांना असते..

– आपण राहतो तो प्रदेश उष्णकटीय आहे. जगात बाकीच्या ठिकाणी हवामानात तापमान- म्हणजे थंडी आणि उन्हाळा हेच महत्त्वाचे समजले जाते. आपल्यासाठी मात्र महत्त्व पावसाला आहे. वळवाचा पाऊस हा एकेकटय़ा ढगातून पडतो. म्हणूनच एकाच ठिकाणी काही भागात पाऊस आहे तर त्याच्याच शेजारच्या भागात नाही, अशी स्थिती असते. पावसाळ्यातील पाऊस मात्र शेकडो किलोमीटर पसरलेल्या ढगांच्या संकुलातून पडतो. ढग निर्माण होईल का आणि त्यांचे संकुल तयार होईल का, ही अस्थिर प्रणाली आहे. अशा अस्थिर प्रणालीविषयी अंदाज व्यक्त करणे अवघड असते. गेल्या ५-६ वर्षांत चक्रीवादळांचे अंदाज बरोबर वर्तवले गेले व तसा आगाऊ इशाराही देण्यात आला होता. लहान पल्ल्याच्या (शॉर्ट रेंज) हवामानाच्या अंदाजात गेल्या दहा वर्षांत भरपूर सुधारणा झाली आहे.