महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात ‘समाज माध्यमा’ने धुमाकूळ घातला आहे. ‘पोस्ट’ आणि ‘पोस्टर’ युद्धाचा अतिरेक झाल्याने  वातावरण आणखी खराब होत चालले आहे. ‘दादा’, ‘भाई’, ‘भाऊ’, ‘आप्पा’, ‘अण्णा’ असे जे कोणी श्रद्धेय असतील त्यांचे विचार हेच ‘आदर्श’ मानून त्याचाच पाठपुरावा करणारे त्यांचे अनुयायी जागोजागी आहेत. अजित पवार हे विरोधी पक्षांच्या रडारवर आहेत. ‘भाजपची झाली राष्ट्रवादी’ हा कळीचा मुद्दा आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्ट कारभार, विकासकामांचे श्रेय, बारामतीचे गाजर, भाजपची ‘वॉिशग मशीन’, ‘कमळाबाई’,  ‘निष्ठा नको, आर्थिक सक्षमता हवी’, यांसारखे  विषय हाताळण्यात येत आहेत. ‘अति झाले आणि हसू आले’ असे चित्र निर्माण झाले आहे.

ताई, माई, अक्का, विचार करा पक्का, …. चिन्हावर मारा शिक्का, अशी आरोळी, उमेदवारांच्या प्रचारासाठी रंगवल्या जाणाऱ्या उभ्या-आडव्या भिंती, महत्त्वाच्या चौकांतच उमेदवारांचे कापडी बॅनर, कर्णे लावून फिरणाऱ्या रिक्षा, गाव-पारावर होणाऱ्या घोंगडी बैठका, थकल्याभागल्या कार्यकर्त्यांसाठी मटकी, कांदा-मिरचीयुक्त भेळीची पार्टी असे काहीसे निवडणुकांचे चित्र आता विस्मरणात गेले आहे. ‘जमाने के साथ चलो’ म्हणत सगळं काही बदललं, त्यात निवडणुकीचे ‘तंत्र’ आणि ‘मंत्र’ही बदलून गेले. पूर्वीसारख्या निवडणुका आता राहिल्या नाहीत आणि तसा प्रचारही आता होत नाही. नीतिमूल्याची चाड नसलेल्या या निवडणुकांना अक्षरश: ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुणवत्तेला फाटा देऊन लक्ष्मीपुत्रांना प्राधान्य मिळू लागल्याने चांगली माणसे त्यापासून चार हात दूर आहेत. सध्याच्या निवडणुकांवर ‘समाज माध्यमा’चा जबरदस्त पगडा आहे. त्याचा इतका धुमाकूळ होतोय, की तो सांगण्यापलीकडे गेला आहे. अतिशय कमी वेळेत वायुवेगाने प्रसिद्धी मिळवण्याचे तसेच एखाद्याची क्षणात अपकीर्ती करण्याचे ते प्रभावी साधन झाले आहे. याचा राजकीय मंडळींकडून सदुपयोग कमी आणि गैरवापरच अधिक होताना दिसतो.

पुणे-मुंबईच्या कुशीत आणि ‘आयटी हब’ हिंजवडीचा शेजार लाभलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात हेच बदललेले स्वरूप अगदी ठळकपणे दिसून येत आहे. वरकरणी शहर आणि आतमध्ये ‘एक गाव, बारा भानगडीं’प्रमाणे गावखाती राजकारण असलेल्या शहरात निवडणूक म्हणजे विचारांची लढाई असते आणि ती विचारांनीच लढली पाहिजे, असे काही मानण्याची पद्धत नाही. ‘दादा’, ‘भाई’, ‘भाऊ’, ‘आप्पा’, ‘अण्णा’ असे जे कोणी असतील त्यांचे विचार हेच ‘आदर्श’ मानून त्याचाच पाठपुरावा करणारे त्यांचे अनुयायी जागोजागी आहेत. ‘हम करे सो कायदा’ असे मानून चालणाऱ्यांच्या मते, प्रचार करणे म्हणजे प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामीच करणे. निवडणुकीच्या राजकारणातील प्रतिस्पध्र्यावर हल्ला हीच विजयाकडे वाटचाल असते, असे मानणे ही यांची रणनीती. त्यात आता ‘समाज माध्यम’सारखे प्रभावी हत्यार मिळाल्याने काही सांगण्याची सोय राहिली नाही. कार्यकर्ते सकाळ-संध्याकाळ याच कामात जुंपलेले दिसतात. लोकसभा निवडणुकीत याची बऱ्यापैकी चुणूक दिसली होती. ‘पोस्ट वॉर’वरून अनेक वाद झाले, त्यात काहींना रट्टेही खावे लागले. विधानसभा निवडणुकीतही तीनही मतदारसंघांत त्याची पुनरावृत्ती झाली. भोसरीपट्टय़ात ‘गाजराने’ धुमाकूळ घातला. आता महापालिका निवडणुका लागल्या असून, अल्पावधीत समाज माध्यमावरील प्रचाराने, अपप्रचाराने कळस गाठला आहे.

लोकसभेला दोन आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांत शहराची विभागणी होते. पालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभाग आहेत. त्यामध्ये प्रत्येकी चार जागा आहेत.

एकूण १२८ जागांसाठी जे काही हजार-पाचशे उमेदवार रिंगणात राहतील, समाज माध्यम हेच त्यांच्या प्रचाराचे मुख्य साधन आहे. ‘मतदार राजा’ला भल्या सकाळी ‘सुप्रभात’पासून ते उशिरा रात्रीच्या ‘शुभरात्री’ संदेशाच्या माध्यमातून छळण्याचे काम ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे सुरू आहे. सुविचार स्वत:च्या नावावर खपवून नागरिकांना उपदेशाचे डोस पाजणे, हा उमेदवारांचा नित्यनियम बनला आहे. दिवसभर मतदारांच्या घेतलेल्या गाठीभेठी, प्रभागातील नागरिकांचे वाढदिवस, निवेदने, आंदोलने अशा ढीगभर ‘पोस्ट’ आणि छायाचित्रे पाठवण्याचा सपाटा उमेदवारांकडून सगळीकडे सुरू आहे आणि त्याचा सर्वानाच उबग आला आहे. त्याही पलीकडे जाऊन राजकीय वर्तुळात एकमेकांचे वस्त्रहरण सुरू झाले आहे. उमेदवार पातळीवर हे युद्ध कमी पडले म्हणून की काय, राजकीय पक्षांनीही त्यात उडय़ा घेतल्या आहेत. काही दिवसांपासून शहरात ‘पोस्ट’ आणि ‘पोस्टर युद्ध’ सुरू आहे. त्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. इतर पक्षांचा सहभाग तूर्त तुलनेने कमी असला तरी यापुढील काळात कोणीही कोणाला कमी पडणार नाही, अशी व्यवस्था प्रत्येक पक्षाने करून ठेवली आहे. या पोस्टरबाजीतून केली जाणारी विधाने वादग्रस्त आहेत. विकासाचे दावे आणि भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्योराप इथपर्यंत मर्यादित न राहता वैयक्तिक पातळीवर चिखलफेक सुरू झाली आहे. अजित पवार हे विरोधी पक्षांच्या रडारवर आहेत. ‘भाजपची झाली राष्ट्रवादी’ हा कळीचा मुद्दा आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असो, की पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्ट कारभार, विकासकामांचे श्रेय, बारामतीचे गाजर, भाजपची ‘वॉिशग मशीन’, ‘कमळाबाई’, सेटलमेंट किंग, ‘आयाराम-गयाराम’, नेत्यांच्या बेडूकउडय़ा, भ्रष्टाचाराचे पार्टनर, ‘बारामती-भानामती’, ‘निष्ठा नको, आर्थिक सक्षमता हवी’, ‘सारंग नव्हे सुरुंग’ आणि ‘भोसरीचा पप्पू’ यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. ‘अति झाले आणि हसू आले’, इतका अतिरेक झाला आहे. सर्व मर्यादा ओलांडल्या जात आहेत. उघडय़ा डोळय़ांनी सर्वाना दिसत असूनही या प्रकारावर कोणाचेही नियंत्रण नाही. महापालिका अथवा निवडणूक आयोग याकडे पाहायला तयार नाही. आमचे काम नाही म्हणून पोलीस यंत्रणाही दखल घेत नाही. परिणामी, हे वाढत चालले आहे. त्यातून मुळातच गढूळ असलेले शहरातील राजकारण आणखी खराब होणार आहे. भविष्यात यातून एखादे ‘महाकांड’ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.