सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्यानिमित्त पुणे महापालिकेच्या वतीने सणस मैदानावर शाडू मातीच्या मूर्ती साकारण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात ११६ शाळांतील तब्बल ३ हजार ८२ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याच वर्षी वर्षी हाँककाँग येथे एकाच वेळी १०८२ मूर्ती साकारण्याचा विक्रम प्रस्थापित झाला होता. त्यानंतर आज पुण्यात ३०८२ विद्यार्थ्यांनी १तास ३१ मिनिटांत प्रत्येकी एक मूर्ती साकारत विद्यार्थ्यांनी एकूण ३०८२ शाडूच्या मूर्ती तयार करच नवा विक्रम नोंदवला आहे, अशी माहिती गिनीज बुक सल्लागार मिलिंद वेर्लेकर यांनी दिली.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ३ किलो मातीची पिशवी आणि त्यासोबत २ बिया देण्यात आल्या होत्या. जावडेकर यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर या उपक्रमास सुरुवात झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, अशी भावना उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केली. लाडक्या बाप्पाची मूर्ती साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.