उस्ताद थिरकवाँसाहेब, पं. विनायकराव घांग्रेकर, पं. लालजी गोखले यांच्याकडून आलेली विद्या जतन करून भाईंनी पुढच्या पिढीपर्यंत हातचे न राखता पोहोचविली. सुरेल, डौलदार तरीही वजनदार असे वादन करणारे भाई हे आमच्या पिढीचे आदर्श तबलावादक आहेत, अशी भावना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली.
पं. वसंतराव घोरपडकर स्मृतिदिन समारोह समितीतर्फे माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे यांना ‘मृदंगाचार्य शंकरभय्या पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये, मानपत्र आणि मृदंगवादन करणारी गणेशमूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रमोद घोरपडकर, पद्मा तळवलकर, पं. शरद साठे, पं. रत्नाकर गोखले या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र संगीत हे कीर्तन परंपरेतून सुरू झाले असून पखवाज अथवा मृदंग हे त्यातील प्रमुख वाद्य आहे. वारकरी परंपरेत नानासाहेब पानसे यांच्यापासून पखवाजवादनाची परंपरा सुरू झाली. त्या परंपरेतून आलेला असल्यामुळे ‘शंकरभैय्या पुरस्कार’ हा सरकारी पुरस्कारापेक्षा मोठा आहे, असे तळवलकर यांनी सांगितले. या पुरस्काराच्या माध्यमातून पखवाज परंपरा पुढे नेण्याचे काम घोरपडकर कुटुंबीय करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पं. वसंतराव घोरपडकर यांच्या आठवणींना उजाळा देत भाई गायतोंडे म्हणाले,‘‘नानासाहेब पानसे आणि शंकरभय्या हे प्रासादिक वादक होते. शंकरभय्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा मृदंग विद्येचा प्रसाद म्हणून स्वीकारतो.’’
उल्हास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. रामदास पळसुले यांच्या तबलावादनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यांना मििलद कुलकर्णी यांनी संवादिनीची साथ केली. उत्तरार्धात उस्ताद बहाउद्दीन डागर यांचे रुद्रवीणावादन झाले. त्यांना प्रताप आव्हाड यांनी पखवाजची आणि बेला नायक यांनी तानपुऱ्याची साथ केली. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. लीलाधर वाबळे यांनी आभार मानले.