साहित्यिक आणि इतिहास संशोधक प्रा. शरदचंद्र श्रीधर ऊर्फ श. श्री. पुराणिक (वय ८३) यांचे बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशाभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुराणिक यांचा जन्म लोणावळा येथे झाला. संस्कृत आणि इंग्रजी विषयामध्ये त्यांनी एम. ए. पदवी संपादन केली. चाळीसगाव येथील कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा करून निवृत्त झाले. लेखन आणि इतिहास संशोधनाची त्यांना आवड होती. व्यासंगी संशोधक म्हणून त्यांची ख्याती होती. पहिला बाजीराव पेशवा (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध), विश्वनाथ राजवाडे : व्यक्तित्व-कर्तृत्व आणि विचार, रामदास रियासतकार, मराठय़ांचे स्वातंत्र्यसमर, तुळाजी आंग्रे-एक विजयदुर्ग, श्रीपाद महादेव माटे-व्यक्तीदर्शन, बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवा, य. न. केळकर-एक ऐतिहासिक पोवाडा, पेशवा बाजीराव दुसरा अशी इतिहास विषयावरील त्यांची १७ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्राचा पहिला भाग मागील आठवडय़ातच प्रकाशित करण्यात आला होता.