शरद पवार यांची टीका

निश्चलनीकरणातून काळा पैसा बाहेर आल्याचे भासवले गेले. परंतु प्रत्यक्षात सर्व चलन परत आले. वस्तू व सेवा कर लागू करण्याची भूमिका तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतल्यानंतर त्याला तीव्र विरोध करणाऱ्यांनी सत्तेवर आल्यानंतर तोच कायदा लागू केला. वेगवेगळ्या प्रश्नांवर सत्तेत नसताना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी तीन वर्षांत काय केले ते दिसतेच आहे, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी सरकारला लगावला.

शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरामध्ये पवार यांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. इंधनाचे वाढते दर, निश्चलनीकरण, वस्तू व सेवा कर (जीएसटी) यांबाबत त्यांनी भाष्य केले.

पवार म्हणाले, जगभरात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत. जागतिक पातळीवरील किमतीच्या जवळपास देशातील इंधनाची किंमत आणायची, ही एक संधी भारत सरकारला होती. सर्वसामान्य माणूस महागाईच्या संकटात जाण्यात निश्चलनीकरण आणि जीएसटी या दोन गोष्टींची भर पडली. नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर आला, असे भासवले गेले. परंतु, प्रत्यक्षात जवळपास सर्व चलन परत आले. तर, जीएसटी लागू करण्याबाबतची भूमिका प्रथमत: तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली होती. त्यावेळी या कायद्याला तीव्र विरोध करणाऱ्यांनीच सत्तेत आल्यानंतर हा कायदा लागू केला. देशाची अर्थव्यवस्था संकटात आली असून विकासदर नऊवरून पाच टक्क्य़ांवर आला आहे.

राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले, जी राजकीय प्रणाली आज सत्तेवर आहे, त्यांनी सत्तेत नसताना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशा प्रकारचे चित्र उभे केले होते. मात्र, सत्तेवर आल्यानंतर तीनच वर्षांत आपण कुठे आलो आहे ते दिसते आहे. त्यामुळे या प्रश्नांना तोंड देण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन पर्याय उभा केला पाहिजे. विरोधी लोकांकडून लोक अपेक्षा करत आहेत आणि जनतेच्या अपेक्षा असतात तेव्हा त्यांना निराश करता कामा नये.

राणेंनी स्वत:ला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा

राणे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असून योग्य वाटेल तो निर्णय त्यांनी घ्यावा. परंतु, गेल्या तीन निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने राणे यांच्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षांची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांच्याच जिल्ह्य़ातील मंत्र्याने केलेले विधान माझ्या वाचनात आले आहे. त्यामुळे राणे यांचा निर्णय स्थानिक लोकांना कितपत आवडेल हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्याबाबत आणखी काही बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत पवारांनी राणेंबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

समविचारी पक्षांनी एकत्र येण्याबाबत ३ ऑक्टोबरला मुंबईत बैठक 

नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाचा विकासदर कमी झाला असून बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे. जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी होऊनही देशांतर्गत पेट्रोलचे दर वाढलेलेच आहेत. या सर्व प्रश्नांबाबत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याबाबत ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत देशासह राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाची भूमिका ठरविली जाईल, असे पवार यांनी सांगितले.