केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना रविवारी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दुपारी पुण्यात हलविण्यात आले. डॉक्टरांनी मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी तपासणी केली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
कोल्हापूर येथे सरपंच परिषदेचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर पवारांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना विश्रामगृहात हलविण्यात आले. तेथे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने हेलिकॉप्टरने पुण्याला हलविण्यात आले. मोदीबाग येथील निवासस्थानी डॉक्टरांच्या पथकाने पुन्हा त्यांची तपासणी केली. सध्या पवार विश्रांती घेत आहेत. याबाबत डॉ. रवी बापट यांनी सांगितले की, पवार यांना काहीसा अशक्तपणा आला आहे. खोकला व कफचा त्रास आहे. एक दिवस विश्रांती घेऊन ते बाहेर पडू शकतील.