‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे शिवसेनेकडून निषेध

सिक्कीम, केरळ अशा ‘अभ्यास’ दौऱ्यांच्या नावाखाली सहली काढून करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. अशाप्रकारे पैशांची उधळपट्टी सुरू राहिल्यास श्रीमंत महापालिकेला लवकरच भिकेचे डोहाळे लागतील, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहलींचा सपाटा लावला आहे. दौऱ्यांवरून राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठत असतानाही नवनव्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात राष्ट्रवादी नगरसेवकांची चढाओढ सुरू आहे. शिवसेनेने अशा दौऱ्यांच्या निषेधार्थ बुधवारी िपपरीत आंदोलन केले. शहरप्रमुख राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली िपपरीतील आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात नगरसेवक धनंजय आल्हाट, संपत पवार, अश्विनी चिंचवडे, विमल जगताप, शारदा बाबर, राम पात्रे, संगीता पवार, माजी नगरसेवक मधुकर बाबर, श्याम लांडे, विनायक रणसुभे, भगवान वाल्हेकर, गजानन चिंचवडे आदींसह मोठय़ा संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. या वेळी कलाटे म्हणाले, सत्तेच्या जोरावर राष्ट्रवादीचा मनमानी कारभार सुरू असून अशाप्रकारे उधळपट्टी सुरू राहिल्यास पालिकेला भिकेचे डोहाळे लागतील.

सभेनंतर आयुक्त दिनेश वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात, योग्य कार्यवाही करू, अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली.