शिवसेना, पुणे

महापालिका निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती करण्याची प्राथमिक चर्चा सुरू झालेली असतानाच प्रभागनिहाय बैठका घेत शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याचीही दुसरीकडे तयारी सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शिवाय काही इच्छुक उमेदवारांनी अहवाल छापून तसेच कार्यालय उघडून प्रचारही सुरू केला आहे. शिवसेना-भाजप युती झाली तर मोक्याच्या जागा शिवसेनेला सोडाव्या लागतील, तसेच भाजपही वरचढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती नकोच, अशी जोरदार चर्चाही शिवसेनेत ऐकायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे चर्चा वगैरे सुरू असली तरी स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरू आहेच.

महापालिकेच्या निवडणुका आतापर्यंत युती करूनच लढवल्या गेल्या. विधानसभा निवडणुकीच्या आधी युती संपुष्टात आल्यानंतर सत्तेत असूनही भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचे बोलले जाते. महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून स्वबळाची भाषा सुरू झाली. ‘कारभारी बदला’ अशी हाकाटी देत परिवर्तन करण्याची मागणी शिवसेनेकडून सुरू झाली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसबरोबरच भाजपलाही शिवसेनेकडून वेगवेगळ्या निमित्तांनी ‘लक्ष्य’ करण्यात आले. सुरुवातीपासूनच स्वबळावर लढण्याची तयारी सेनेकडून सुरू झाली होती. निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाचे वातावरण लक्षात घेऊन अन्य पक्षांकडून भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रवेश झाले. मात्र शिवसेनेचा एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी पक्ष सोडून गेला नाही, हीच बाब त्या पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट करणारी आहे आणि शिवसेनेच्या इच्छुकांनीही तसेच गृहीत धरले होते.

मुलाखतीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यास काही दिवस राहिलेले असतानाच भाजप-सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचेच दिसून येते. स्वबळावर लढण्याच्या हालचाली सुरूझाल्या असताना अन्य काही पक्षातील प्रमुख पदाधिकारी किंवा सक्षम कार्यकर्त्यांना सेनेत आणण्याचे प्रयत्नही सेनेकडून होणार होते. पक्षाकडून तसे स्पष्ट संकेतही देण्यात येत होते. मात्र आता सध्या ही प्रक्रिया थंडावली असून, आता पक्षाच्या प्रभागनिहाय बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील युती तोडण्याचा अनुभव लक्षात घ्या आणि ताकदीने निवडणुकीला सामोरे जा, असा कानमंत्र या निमित्ताने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचीही चर्चा आहे. मतदार याद्यांची छाननी करण्याचे कामही पक्षाकडून सुरू झाले आहे.