महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युतीच्या शक्यतेबाबत साशंकता

राजकीयदृष्टय़ा एकमेकांना पराभूत करण्यासाठी आतूर असलेल्या भाजप-शिवसेनेने राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यापाठोपाठ होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये युतीची शक्यता कितपत राहील, याविषयी दोन्हीकडून साशंकता आहे. िपपरीत बलाढय़ राष्ट्रवादीशी दोन हात करण्यासाठी भाजप-सेनेत युती आवश्यक असल्याचे मान्य असूनही दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमधील तीव्र मतभेदांमुळे युतीविषयी सावध पवित्रा घेतला जात आहे.

राज्यातील २१२ नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसाठी भाजप-शिवसेनेत युती होणार असल्याची घोषणा गुरुवारी संयुक्तपणे करण्यात आली. ठराविक नगरपालिकांमध्ये युती न करता राज्यातील सर्वच ठिकाणी युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले. दोन्ही काँग्रेसशी सामना करताना युती अधिक ताकदीने या निवडणुकांना सामोरे जाऊ शकणार आहे. तथापि, राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ही युती असेल की नाही, याविषयी आताच ठामपणे कोणीही सांगणार नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कारभारी असलेल्या पिंपरी पालिकेच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी बलाढय़ आहे. त्याविरोधात भक्कमपणे लढत देण्यासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांच्यात महायुती होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. भाजप-रिपाइं यांच्यातील युती झाल्यात जमा आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. ‘मातोश्री’वर अंतिम निर्णय होणार असल्याचे स्थानिक नेते सांगतात. तर, स्थानिक पातळीवरून शिफारस होईल, त्याप्रमाणे निर्णय होईल, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात येते. महायुती झाली पाहिजे, अशी भाजप नेत्यांची सध्याची भाषा आहे. मात्र, पुढे नक्की काय, याविषयी भाजप वर्तुळातूनही ठोसपणे सांगितले जात नाही. त्यामुळे महायुतीविषयी तूर्त संभ्रमावस्था असल्याने दोन्हीकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. स्थानिक नेत्यांमध्ये असलेले तीव्र मतभेद पाहता महायुतीचा निर्णय स्थानिक पातळीवर होणे अवघड आहे. भाजप-शिवसेना एकत्र न आल्यास राष्ट्रवादीचा थेट फायदा होणार आहे. युती न झाल्यास राष्ट्रवादीकडून काँग्रेसशी आघाडी करण्याची शक्यताही राहणार नाही.