वरकरणी सकारात्मक चर्चा; आतून कुरघोडय़ांचे राजकारण

भाजप-शिवसेना व रिपाइं (आठवले गट) यांच्यात महायुती झाल्यास काय परिस्थिती निर्माण होईल, याचा अंदाज आल्याने एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धास्ती घेतली असताना, दुसरीकडे मात्र सेना-भाजप नेत्यांचे वैयक्तिक वाद, फाजील आत्मविश्वास व अतिमहत्त्वाकांक्षेमुळे युती होण्यात मोठे अडथळे निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले आहे. वरकरणी युतीसंदर्भातील सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दावे करण्यात येत असले तरी आतून मात्र कुरघोडय़ांचे राजकारण सुरू असल्याची खात्रीशीर माहिती आहे.

पिंपरी पालिकेच्या ३२ प्रभागांच्या १२८ जागांसाठी भाजप-शिवसेना व रिपाइंच्या महायुतीसाठी चर्चा, बैठका सुरू आहेत. प्रारंभी बैठकाच होत नव्हत्या, टाळाटाळ होत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्यानंतर चिंचवडला पहिली बैठक झाली, तेव्हा कोंडी फुटली आणि चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर आकुर्डीतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. तेथे थेरगावच्या जागांवरून चर्चेची गाडी थांबली. मंगळवारी रात्री वाकडच्या ‘सयाजी’ येथे पुन्हा बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नाही. शुक्रवारी (२० जानेवारी) पुन्हा वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. अशा बैठकांमध्ये युती करू, असे सांगितले जाते. काही मुद्दय़ांवर सकारात्मक चर्चाही होते. मात्र, महत्त्वाच्या व कळीच्या मुद्दय़ांवरून वादविवाद होत असल्याने पुढील चर्चा अपेक्षितरीत्या पुढे जात नाही. विशेषत: चिंचवड मतदारसंघातील काही जागांच्या वाटपाचा तिढा कायम आहे. एकमेकांच्या बालेकिल्ल्यात घुसू न देण्याची रणनीती दोन्हीकडून सुरू आहे. यामागे महापालिकेपेक्षा पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे गणित मांडले जात आहे.

मुळात युतीसाठी चर्चेला बसणाऱ्या अनेक नेत्यांचे एकमेकांशी बिलकूल पटत नाही. मात्र, युतीधर्म म्हणून त्यांना समोरासमोर बसावे लागत आहे. त्यांच्यात सुसंवाद होण्याची शक्यता कमीच असल्याची खात्री दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते व्यक्त करत आहे. संघाकडून मात्र युती व्हावी, यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेकडे येऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रवादीत पाठवून देण्याची, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या नगरसेवकास निवडून येण्यासाठी शिवसेनेतून ‘फििल्डग’ लागल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपचे युतीविषयी काहीतरी वेगळेच राजकारण असल्याची शंका शिवसेनेत आहे. शिवसेनेकडून मागण्यात येणाऱ्या निम्म्या जागा देण्यास भाजपमध्ये तीव्र विरोध आहे. रिपाइं व रासप या मित्रपक्षांना जागा कोणी सोडायच्या आणि कोणत्या जागा द्यायच्या, याविषयी मतभेद आहेत.

चित्र असे आहे..

  • शिवसेना-भाजप नेत्यांचे वैयक्तिक वाद
  • अतिमहत्त्वाकांक्षेमुळे युती होण्यात मोठे अडथळे
  • विद्यमान नगरसेवकांसाठी जागा सोडण्याचा मुद्दा भाजपला अडचणीचा
  • शिवसेनेकडून मागण्यात येणाऱ्या निम्म्या जागा देण्यास भाजपमध्ये तीव्र विरोध